मुंबई, ठाण्यासह नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 01:34 PM2019-09-27T13:34:29+5:302019-09-27T13:36:42+5:30
नगरसेविका स्वप्ना गावडे महिला कार्यकर्त्यांसोबत 'बुरखा' घालून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.
मुंबई - ठाण्याहून मुंबईत येण्यासाठी राष्ट्रवादीच्या ऑफिसमधून शहर अध्यक्ष आनंद परांजपे, पदाधिकारी आणि महिला कार्यकर्त्या निघत असताना त्यांची धरपकड करून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शहर अध्यक्ष आनंद परांजपे, विरोधी पक्ष नेते मिलिंद पाटील, नगरसेवक सुहास देसाई यांना पोलिसांनी नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. नवी मुंबई येथे सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना मुंबईत जाण्यापासून अडविले जात असून काही पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतले.मात्र, आमदार शशिकांत शिंदे यांनी लोकलने मुंबईकडे प्रवास सुरु केला आहे.
वाशी टोल नाका येथे राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या असून १५ ते २० गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे. नवी मुंबई राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष 'अशोक गावडे' यांना नेरुळ पोलिसांनी पक्ष कार्यालयातून अटक करण्यात आली आहे. मुंबईत ईडी कार्यालयात रवाना होत असताना कार्यकर्त्यांनी निदर्शने केली होती. नगरसेविका स्वप्ना गावडे महिला कार्यकर्त्यांसोबत 'बुरखा' घालून मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तसेच मुंबईत देखील राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी धरपकड केली जात आहे.