पिंपरी : बंद चायनीज गाडी सुरु करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच स्विकारताना निगडी पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. प्रविण वासुदूव मुळूक (वय ३६) असे त्या पोलिसांचे नाव असून ही कारवाई निगडी पोलीस ठाण्यासमोर मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे फिर्याद दिली आहे. प्राधिकरणातील ट्रान्सपोर्टनगरी येथे एक जण चायनीज गाडीवर व्यवसाय करतो. ही गाडी अनेक महिन्यांपासून बंद होती. ही गाडी सुरु करण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई न करण्यासाठी मूळूक याने त्यांच्याकडे पाच हजार रूपयांची मागणी केली. तडजोडीअंती तीन हजार रुपये देण्याचे ठरले. याबाबत व्यवसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागास माहिती दिली. त्यानुसार, सापळा रचला. मंगळवारी दुपारी पोलीस ठाण्याबाहेर तीन हजाराची लाच स्विकारताना मुळूक याला रंगेहाथ पकडले आहे.