दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोघांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 07:38 PM2019-11-07T19:38:49+5:302019-11-07T19:39:45+5:30
दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली...
पिंपरी : दहा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन फरार असलेल्या दोन आरोपींना पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनीअटक केली. अटक केलेल्या दोन आरोपींनी त्यांच्या अन्य एका साथीदारासोबत मिळून २००९ साली भोसरी परिसरात गंभीर दुखापतीचा गुन्हा केला होता.
अनिल रावसाहेब गायकवाड उर्फ जाधव (वय २५), चंद्रकांत गोविंद पवार (वय ३३, दोघे रा. शांतिनगर, भोसरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करत असताना पोलीस शिपाई गणेश सावंत यांना माहिती मिळाली की, भोसरी परिसरात गंभीर दुखापतीचा गुन्हा केलेले दोन आरोपी शांतीनगर झोपडपट्टी मधील बौद्ध विहाराजवळ येणार आहेत. या आरोपींनी त्यांच्या आणखी एका साथीदारासोबत मिळून २००९ साली गंभीर दुखापतीचा गुन्हा केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी परिसरात सापळा रचला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून शिताफीने दोघांना अटक केली. आरोपी आणि शांतीनगर येथील नागरिक डोंगºया राठोड यांचामध्ये २००९ साली किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. त्यावेळी आरोपी अनिल गायकवाड, चंद्रकांत पवार आणि शिवदास गायकवाड या तिघांनी मिळून डोंगºया राठोड याला मारून जखमी केले. दरम्यान, पोलिसांनी शिवदास गायकवाड याला अटक केली. पण अन्य दोघेजण अद्याप फरार होते.
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सह पोलीस आयुक्त प्रकाश मुत्याळ, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर आर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील, उपनिरीक्षक काळुराम लांडगे, कर्मचारी मनोज कुमार कमले, गणेश सावंत, प्रवीण मोरे, विजय मोरे यांच्या पथकाने केली.