गोंदिया - आरोपीकडून ४ हजार रुपयांची लाच घेतांना शहर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत पोलीस हवालदाराला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चमूने सापळा रचून बुधवारी (दि.१७) दुपारी रंगेहात पडकले. हिरादास सुखदेव पिल्लारे (४७) असे लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार तक्रारकर्त्याच्या मुलाला व इतर दोघांच्या विरोधात गोंदिया शहर पोलीस ठाण्यात १ जुलै रोजी भादंविच्या कलम ३२४, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणाची विचारपूस करण्यासाठी तक्रारकर्त्याच्या मुलाला पोलीस हवालदार पिल्लारे याने २ जुलै रोजी पोलीस ठाण्यात बोलाविले. यावेळी त्याला अटक करण्याची धमकी दिली. अटक झाल्यावरही लॉकअपमध्ये न टाकण्यासाठी ५ हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. यासंदर्भात मुलांने आपल्या वडिलाला माहिती दिली. तक्रारकर्त्याने यासंदर्भात १४ जुलै रोजी पोलीस हवालदार पिल्लारे यांची भेट घेतली. त्यावेळी सुध्दा पिल्लारे यांनी त्यांच्याकडून ५ हजार रुपयांची मागणी केली. तुमच्या मुलाला लॉकअपमध्ये न टाकण्याचे ५ हजार रूपये द्या असे म्हटले. तक्रारकर्त्याने १५ जुलै रोजी याप्रकणाची तक्रार भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला केली. १७ जुलै रोजी सापळा रचण्यात आला. त्यानंतर तक्रारकर्त्याकडून ४ हजार रूपयांची लाच घेतांना हिरादास पिल्लारे याला रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील,पोलीस कर्मचारी रंजीत बिसेन, दिगांबर जाधव, नितिन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, गीता खोब्रागडे, वंदना बिसेन व चालक देवानंद मारबते यांनी केली. शहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.
४ हजार रुपयांची लाच घेताना हवालदार अडकला
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 9:28 PM
शहर पोलीस ठाण्यात कारवाई; मारहाण प्रकरणातील आरोपीकडून घेतली लाच
ठळक मुद्देशहर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला.हिरादास सुखदेव पिल्लारे (४७) असे लाच स्विकारणाऱ्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.