बेपत्ता बहिणीच्या तपासासाठी पोलिसाने मागितली लाच
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 08:30 PM2018-09-29T20:30:16+5:302018-09-29T20:46:09+5:30
बेपत्ता बहिणीचा शोध घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़.
पुणे : बेपत्ता बहिणीचा शोध घेण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून पकडले़. पोलीस नाईक बापू नामदेव रोटे (वय ४०, रा़ वरदविनायक सोसायटी, दौंड) असे त्यांचे नाव आहे़. तक्रारदार यांची बहिण गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहे़. दौंड पोलीस ठाण्यात त्याचा गुन्हा दाखल असून त्याचा तपास रोटे यांच्याकडे आहे़. बहिणीचा शोध घेण्यासाठी त्यांनी तक्रारदारांकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली़. त्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली़.
या तक्रारीची शनिवारी पडताळणी केली़. त्यांना पाटस येथील भीमा साखर कारखान्याजवळ पैसे घेऊन बोलविले़. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा रचला़. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये घेताना रोटे यांना रंगेहाथ पकडण्यात आले़. याप्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी एकाच दिवसात दोन ठिकाणी सापळा कारवाई करुन तिघांना अटक केली आहे़.