अत्याचार प्रकरणी पोलिसांनी आरोप फेटाळलेत; उच्च न्यायालयात दाखल केले प्रतिज्ञापत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 02:59 AM2020-07-04T02:59:35+5:302020-07-04T02:59:53+5:30
इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली
मुंबई : मार्च अखेरपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनची अंमलबजावणी करताना पोलिसांनी काही पादचाऱ्यांना मारहाण केल्याने त्यात काही लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप मुंबई पोलिसांनी फेटाळला. तसे प्रतिज्ञापत्र शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखल केले. जे.जे. मार्ग पोलीस ठाण्याचे निरीक्षक इकबाल आवळकर यांनी मानवाधिकार कार्यकर्ते व वकील फिरदौस इराणी यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल केले.
इराणी यांच्या म्हणण्यानुसार, लॉकडाऊनदरम्यान इराणी, त्यांची पत्नी आणि दोन मुलांना पोलिसांनी १६ मे रोजी त्यांच्या गोरेगाव (पश्चिम) येथील राहत्या घराबाहेर विनाकारण मारहाण केली. लॉकडाऊनमधील निर्बंधाच्या नावाखाली पोलिसांनी अनेक लोकांना नाहक मारहाण केल्याचे सिद्ध करण्यासाठी इराणी यांनी मानवी अधिकार संघटनेचा अहवालाचा न्यायालयाला हवाला दिला. पोलिसांच्या मारहाणीत १५ जणांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यात मुंबईतील समीर जमाल खान व राजू वेलू देवेंद्र अशी पीडितांची नावे आहेत. दक्षिण मुंबई व जुहू पोलीस ठाण्यातील पोलिसांनी मारहाण केल्याने खान याचा मृत्यू झाला, असे इराणी यांनी याचिकेत म्हटले आहे. आवळकर यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, खान हातगाडीवरून रेफ्रिजरेटर आणि काही कपडे नळबाजारात नेत होता. त्याला कोणत्याही पोलिसाने अडविले नव्हते, हे सीसीटीव्ही फुटेजवरून सिद्ध होते.