मुंबई - माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे सांगून सरकारी कोट्यातून स्वस्तात जमीन देण्याचे आमिष दाखवून अनेकांना चुना लावणाऱ्या संतोष दगडू मांजरे (४८) याला पोलिसांनी सोलापूरमधून अटक केली असल्याची माहिती गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. १० दिवसांपूर्वी मांजरेला अटक करण्यात आली असून त्याची रवानगी आता आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली असल्याची माहिती माने यांनी दिली.
मांजरे हा अटक टाळण्यासाठी सोलापुरात शेतात लपून बसला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी साध्या वेशात पाळत ठेवून मांजरेला अटक केली. संतोष मांजरे हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील रहिवाशी आहे. संतोष मांजरे आणि वनमाला खरात यांनी माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी ओळख असल्याचे खुशलचंद पुणेकर यांना सांगितले. पुणेकर यांना बारामतीमधील सरकारी कोट्यातील सहा एकर जमीन ५ लाख ३६ हजार रुपयांना मिळवून देण्याचे अमिष दाखवले. खरात हिने मांजरे याच्या मदतीने पुणेकर यांच्याकडून सव्वा सहा लाख रुपये घेतले होते. पैसे देऊनही जमीन न मिळाल्याने पुणेकर यांनी २०१७ मध्ये गोवंडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या दोघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला.
संतोष मांजरे याचा पोलीस शोध घेत असताना तो सोलापुरात लपून बसल्याने पोलिसांना सापडत नव्हता. मांजरे हा शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने पुणेकर यांच्याकडून घेतलेल्या पैशातून घर बांधल्याचा संशय पोलिसांना आहे. आरोपी मांजरे याच्याविरुद्ध लोणंद, आझाद मैदान पोलीस ठाण्यात फसवणूकीचे गुन्हे दाखल आहेत.