जीम ट्रेनरच्या प्रेमात अडकली, पतीच्या हत्येची सुपारी दिली; प्लॅन A फसला, त्यानंतर...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 02:30 PM2024-06-18T14:30:46+5:302024-06-18T14:32:20+5:30
अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकरासोबत मिळून रचला पतीच्या हत्येचा कट, पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरल्यानंतर दुसऱ्यांदा त्याला ठार केले.
पानीपत - शहरातील विनोद बराडा हत्या प्रकरणी अडीच वर्षांनी मोठा खुलासा झाला आहे. विनोदची हत्या कुठल्याही वादातून नव्हे तर कट रचून सुपारी देऊन करण्यात आली आहे. विनोदची पत्नी निधीने जीम ट्रेनर सुमितसोबत मिळून ही हत्या घडवली. निधीच्या प्रेमात आंधळा झालेल्या सुमितनं सुपारी देत विनोदची हत्या केली. विनोदला अपघातात मारण्याचा कट होता. प्लॅन A यशस्वी झाला नाही, सुपारी किलर अपघाताच्या गुन्ह्यात जेलमध्ये गेला, त्यानंतर आरोपीच्या मुलाचा शिक्षणाचा खर्च सुमितनं केला, प्लॅन B करत आरोपीला जेलमधून बाहेर काढले. त्यानंतर पुन्हा एकदा पिस्तुलाने विनोदला गोळ्या झाडून सुपारी किलरने त्याला संपवला.
या हत्येबाबत पानीपतचे एसपी अजितसिंह शेखावत म्हणाले की, २०२१ मध्ये परमहंस कुटिया यांनी त्यांचा पुतण्या विनोद बराडा जो सुखदेव नगरमध्ये कॅम्प्युटर सेंटर चालवायचा. ५ ऑक्टोबर २०२१ च्या संध्याकाळी विनोदला एका गाडीने धडक दिली. त्यात विनोदचे दोन्ही पाय मोडले. आरोपी वाहनचालकाविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपी देव सुनार उर्फ दीपक याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर १५ दिवसांनी आरोपी देव सुनारनं बराडा यांच्याशी तडजोड करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी नकार देताच आरोपीने धमकी दिली होती.
त्यानंतर एकेदिवशी आरोपी विनोदच्या घरात घुसला आणि त्याला गोळ्या मारल्या. आरोपीनं पोलिसांकडे सरेंडर केले. त्याला पानीपत जेलमध्ये बंद केलं होतं. याच काळात मृत विनोद बराडा यांच्या भावाच्या मोबाईल व्हॉट्सअप मेसेज आला. ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या भावाने या प्रकरणात संशय व्यक्त केला. पोलिसांनी त्यानंतर पुन्हा तपास सुरू केला. तेव्हा आरोपी देव सुनार हा सुमित नावाच्या मुलाशी सातत्याने संपर्कात असल्याचं पुढे आलं. त्यानंतर सुमित आणि विनोद बराडा याच्या पत्नीचे कनेक्शन पुढे आलं.
पोलिसांनी सुमितला चौकशीसाठी बोलावलं, त्यानंतर त्याला अटक करताच त्याने गुन्हा कबूल केला. सुमितनं सांगितले की, २०२१ मध्ये मी एका जीममध्ये ट्रेनर म्हणून काम करत होतो. त्याठिकाणी विनोदची पत्नी निधी जीमला येत होती. या काळात आमची मैत्री झाली. दोघंही एकमेकांसोबत खूप बोलायचो. निधी विनोदसोबत खुश नव्हती. दोघांमध्ये कायम वाद होत असे. त्यानंतर निधी आणि सुमित या दोघांनी मिळून विनोदचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानंतर सुपारी देत देव सुनारला १० लाख रोकड आणि घरचा सर्व खर्च देऊ असं आमिष दाखवलं. सुरुवातीला सुपारी किलर देव सुनारनं विनोदला गाडीने धडक देत मारण्याचा प्रयत्न केला परंतु त्यात विनोद वाचला. त्यानंतर जेलमधून बाहेर आल्यानंतर पुन्हा सुपारी किलरने विनोदला गोळ्या झाडून ठार केले.