विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेप्रकरणी व्यवस्थापकासह दोघांना पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 08:09 PM2021-04-25T20:09:58+5:302021-04-25T20:13:24+5:30
Vijay Vallabh Hospital Fire : या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
संपूर्ण देश हादरून गेलेल्या घटनेत विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात भीषण आग लागून घडलेल्या दुर्दैवी दुर्घटना घडली. या विजयवल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी आज दोघांना अटक करण्यात आली आहे. रुग्णालयाचे व्यवस्थापक दिलीप शहा आणि शैलेश पाठक यांना गुन्हे शाखा ३ कडून अटक करण्यात आली आहे. या दोघांना वसईच्या सत्र न्यायालयात हजर केले असता, एक दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणी चौकशी सुरू असून दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या अन्य जणांना देखील अटक केली जाईल, अशी माहिती या प्रकरणाचा तपास अधिकारी प्रमोद बडाख यांनी दिली. या दुर्घटनेत १५ करोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला आहे.
विरार विजय वल्लभ हॉस्पिटल दुर्घटनेस अग्निशमनदलाचे प्रमुख जबाबदार, भाजपाचा आरोप
शुक्रवारी संध्याकाळी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात रुग्णालयाचे व्यवस्थापक आणि डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी प्राथमिक चौकशीत या दुर्घटनेसाठी रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर हे गुन्हे दाखल करण्यात आले होते.विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयात घडलेल्या दुर्दैवी घटनेत 15 निष्पाप रुग्णांचा होरपळून मृत्यू झाला आणि यात मृतांचे कुटुंबीय, नातलग यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. ही घटना इतकी भीषण होती की,यामुळे वसई-विरार शहरच नाही तर अवघ्या राज्य व केंद्रीय प्रशासन ही या घटनेमुळे गहिवरले. सर्वत्र देशभर याचे पडसाद उमटले व शोककळा पसरली. या घटनेनंतर मृतांच्या वारसांना शासनाकडून तात्काळ मदत जाहीर करण्यात आली. परिणामी या घटनेनंतर विजय वल्लभ रुग्णालय प्रशासन, व्यवस्थापन, डॉक्टर, कर्मचारी आदी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ही दाखल करण्यात आला.
मात्र एवढे करून चालणार नाही तर या 15 रुग्णांच्या घटनेस जे कोणी प्रमुख जबाबदार आहेत त्यांच्यावरही कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत अशोक शेळके यांनी लोकमत शी बोलताना व्यक्त केले आहे. याप्रकरणी राज्य शासनाने अग्निशमन विभागाची सखोल चौकशी करून आजपर्यत (फायर ऑडिट) का करण्यात आले नाही? यास जबाबदार असणाऱ्या अग्निशमन दल प्रमुख दिलीप पालव यांचे तात्काळ निलंबन करून त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावेत अशी मागणी अशोक शेळके यांनी केली आहे.