मोबाईल डिटेल्सवरुन पतीच्या हत्या करणाऱ्या पत्नीला पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2019 07:45 PM2019-02-19T19:45:09+5:302019-02-19T19:48:23+5:30
एक महिन्याने पतीचा मृतदेह पाहूनही पत्नी विचलीत न झाल्याने पोलिसांचा संशय बळावला
सुशांत कुंकळयेकर
मडगाव - पतीचा मृतदेह एका महिन्याने पाहूनही पत्नी किंचितही विचलित होत नाही हे पाहूनच पोलिसांचा पत्नीवरील संशय बळावला. याच संशयातून पोलिसांनी तिच्या मोबाईलचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली आणि या डिटेल्समुळेच एका महिन्यापूर्वी गोव्यातील अनमोड घाटात खून करुन फेकून दिलेल्या संगन गौडा अरुणसीच्या खुन्यापर्यंत पोलीस पोहोचू शकले.
कुळे पोलिसांना 15 जानेवारी रोजी अनमोडच्या जंगलात हा मृतदेह सापडला होता. हा मृत्यू गळा आवळल्याने झाल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा नोंद केला होता. मात्र मयताचीच ओळख पटत नसल्यामुळे या खुनाला वाचा फुटत नव्हती. हा मृतदेह कर्नाटकच्या सीमेवर गोव्यात सापडल्याने कदाचित मृत व्यक्ती कर्नाटकातील असावी, या संशयावरुन मृताचे छायाचित्र कर्नाटकातील वृत्तपत्रत छापण्यात आले होते. याच छायाचित्रमुळे सदर मृतदेह गदग-कर्नाटक येथील संगनगौडा अरुणसी (33) याचा असल्याचे उघड झाले होते.
मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी संगनगौडाची पत्नी लक्ष्मी अन्य नातेवाईकांबरोबर 17 फेब्रुवारी रोजी गोव्यात आली होती. यावेळी आपल्या पतीचा मृतदेह पाहून तिला धक्काही बसला नाही. पोलिसांनी तिच्याकडे चौकशी केली असता, संगनगौडाचे कुणाकडे वैमनस्यही नव्हते. तसेच त्याची आर्थिक स्थितीही त्याचा कुणीतरी खून करावा अशाप्रकारात मोडणारी नव्हती. त्यामुळेच पोलिसांना या प्रकरणात काहीतरी काळेबेरे असावे असे वाटले. यामुळेच त्यांनी लक्ष्मीच्या मोबाईलचे डिटेल्स तपासण्यास सुरुवात केली असता त्यांचाच शेजारी असलेल्या सुरेश पुजार(38) याच्याकडे वारंवार तिचा संपर्क आल्याचे पोलिसांना कळून आले. त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी पोलिसांनी गदगला जाऊन सुरेशला ताब्यात घेतले असता, सुरेशने आपला गुन्हा कबूल केला. हा खून करण्यासाठी त्याला जगदीश वेलाप्पा दोडामणी (39) व मुंदडा सिदप्पा अनाला (35) यांचे सहकार्य लाभले हेही त्याने पोलिसांकडे कबूल केल्याने कुळे पोलिसांनी त्या दोघांनाही अटक करताना ज्या आल्टो कारने त्याला गोव्यात आणले होते ती कारही जप्त केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, मयत संगनगौडा याला दारुचे व्यसन होते. या दारुच्या व्यसनामुळे त्याला अस्थमाची व्याधीही जडली होती. आपल्या पतीची ही अवस्था झाल्याने कंटाळलेल्या त्याच्या पत्नीने शेजारच्या सुरेश याच्याशी संबंध जुळवले होते. एक दिवस सुरेश व आपल्या पत्नीला मयताने नको त्या स्थितीत पाहिल्यानंतर त्यांच्यात वादही सुरु झाला होता. यामुळेच दोघांनीही मयताचा काटा काढण्याचे ठरविले होते. त्याचनुसार 15 जानेवारी रोजी सुरेशने मयताला गोवा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी नेतो असे सांगून आपल्या गाडीत घेतले होते. त्यांच्याबरोबर त्यावेळी आणखी दोघे संशयितही होते. गोव्याजवळ पोहोचल्यानंतर सुरेशने अन्य एका साथीदाराच्या सहाय्याने नायलॉन दोरीने गळा आवळून मयताचा खून केला होता. तर तिसऱ्या साथीदाराने आपल्याबरोबर आणलेले अॅसीड मयताच्या तोंडात ओतले होते. संगनगौडा मेल्याची खात्री झाल्यावर त्याचा मृतदेह जंगलात टाकून ते पळून गेले होते. मात्र दुस:या दिवशी सकाळी बेळगावहून गोव्यात परतणारी सांगेतील एक व्यक्ती अनमोड घाटात सेल्फी काढण्यासाठी थांबली असता, त्या व्यक्तीला हा मृतदेह दिसला, त्याची कल्पना त्या व्यक्तीने पोलिसांनी दिल्यावर पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली.