अहमदनगर: नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याचा तत्कालीन निरीक्षक व सध्या आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला वादग्रस्त पोलीस अधिकारी विकास वाघ याच्याविरोधात अखेर मंगळवारी (दि.29) तरुणीचा छळ करून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी नगर शहरातील एका उपनगरात राहणाऱ्या पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक विकास वाघ याच्या शोधासाठी दोन पोलीस पथके रवाना केली असल्याचे कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी सांगितले.
2019 मध्ये तक्रार देण्याच्या निमित्ताने कोतवाली पोलीस ठाण्यात आलेल्या 26 वर्षीय तरुणीशी वाघ याने ओळख वाढविली. काही दिवसानंतर वाघ हा पीडित तरुणीच्या घरी गेला. तेथे तिच्या असाह्यतेचा फायदा घेऊन रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून वाघ याने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. यावेळी तरुणीने प्रतिकार केला तेव्हा वाघ याने तिला कंबरपट्ट्याने जबर मारहाण केली. तसेच 'ही बाब कुणाला सांगितली तर तुझे कुटुंब संपवून टाकील' अशी धमकी दिली. त्यानंतर वाघ याने पीडितेवर वेळोवेळी अत्याचार केला. पीडित तरुणी गरोदर राहिल्याची बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने 26 सप्टेंबर 2019 रोजी तिला तो राहत असलेल्या बंगल्यावर नेऊन मारहाण करत जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घातल्या. या त्रासाला कंटाळून पीडितेने जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार देण्याचा निर्णय घेतला. ही बाब वाघ याला समजल्यानंतर त्याने पीडितेला एमआयडीसी परिसरात नेऊन धमकी दिली तसेच तिच्या कोऱ्या स्टॅम्प पेपरवर स्वाक्षऱ्या घेतल्या. त्यानंतर 11 सप्टेंबर 2020 रोजी वाघ याने पीडितेला जबरदस्तीने नगर तालुक्यातील मिरावली पाडावर नेऊन तेथेही तिच्यावर अत्याचार करीत जिवे मारण्याची धमकी दिली. असे याप्रकरणी दिलेल्या फिर्यादीत पिडीत तरुणीने म्हटले आहे. तरुणीच्या फिर्यादीवरून वाघ याच्याविरोधात बलात्कार, मारहाण, जबरदस्तीने गर्भपात आदी कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या ठाण्यात निरीक्षक तेथेच दाखल झाला गुन्हा
विकास वाघ कोतवाली पोलीस ठाण्यात निरीक्षक असताना विविध कारणांमुळे वादग्रस्त ठरला होता. त्याचे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर आणि नगर येथील नाजूक प्रकरण गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरले होते. अखेर ज्या पोलिस ठाण्यात तो निरीक्षक होता त्याच पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.