पोलिसाची बापाने केली हत्या, कौटुंबिक कलहातून कोयत्याने केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 01:48 PM2020-03-18T13:48:36+5:302020-03-18T13:52:49+5:30
मृत मुलगा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत
मुंबई - कौटुंबिक कलहातून अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची राहत्या घरात पित्यानेच कोयत्याने हत्या केल्याची खळबळजनक घटना पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगरात घडल्याने, एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी पवई पोलिसांनी वडिलांना अटक केली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर कांबळे यांनी सांगितले.
हरीश गलांडे (४०) असे हत्या करण्यात आलेल्या पोलीस शिपायाची नाव आहे. हरीश हा अंधेरी रेल्वे पोलीस ठाण्यात कार्यरत होता. हरीश हा पवईतील पंचकुटीर येथील गणेश नगर येथे पत्नी मुले आणि आई वडीलांसोबत राहत होता. हरिशला दारूचे व्यसन होते, त्यातच काही वर्षांपासून तो आर्थिक अडचणीत होता अशी माहिती समोर येत आहे. हरीश हा दारूच्या नशेत सतत कुटुंबियांना त्रास देत असल्यामुळे घरात होणाऱ्या वादामुळे वडील गुलाब (६५) हे कंटाळले होते. त्यातच सोमवारी रात्री हरीश हा दारूच्या नशेत घरी आला आणि त्याने पत्नी आणि आई वडिला सोबत वाद घालण्यास सुरुवात केली, या वादातून हरिशने वडिलांच्या दिशेने काचेची बाॅटल भिरकावली असता संतापलेल्या वडिलांनी जवळच पडलेला कोयता हरिशच्या डोक्यात घातला, सपासप वार बसताच हरीश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
त्यानंतर देखील वडील गुलाब यांनी कोयत्याने हरिशवर वार करून त्याची हत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन वडील गुलाब यांना ताब्यात घेऊन जखमी हरीश गलांडेला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात आणले असता डाॅक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पवई पोलिसांनी वडील गुलाब यांच्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली असल्याची माहिती पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक सुधाकर कांबळे यांनी दिली. तर याचा अधकि तपास सुरु आहे. हरीशच्या पश्चात त्याची पत्नी आणि दोन मुलं असा परिवार आहे. हरीशचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळे देखील त्याचे पत्नी आणि घरातल्यांशी खटके उडत असत अशी माहिती पोलिसांनी दिली.