मुंबई : गेल्या अठरा वर्षांत सशस्त्र पोलीस दलातील पोलीस नाईकने १२ कोटी ६५ लाख ६३ हजार ९६६ रुपयांची मालमत्ता जमवल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईतून उघड झाली. याप्रकरणी एसीबीने पोलीस नाईक सुरेश बामणे आणि त्याची पत्नी लता बामणेविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, बामणे हा सशस्त्र पोलीस नायगाव येथे कार्यरत होता. त्याने २००० ते २०१८ या काळात १२ कोटी ६५ लाख ६३ हजार ९६६ रुपयांची मालमत्ता जमवल्याचे उघडकीस आले आहे. उत्पन्नापेक्षा ही मालमत्ता १५१२ टक्के अधिक आहे. त्याने याबाबत सविस्तर माहिती न दिल्यामुळे तपासाअंती भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल केला. यामध्ये पत्नीने त्याला सहकार्य केल्याने तिच्यावरही गुन्हा नोंदवला असल्याचे एसीबीने सांगितले. त्याच्याकडे मालमत्तेबाबत माहिती न आढळल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली.