८० हजाराची लाच स्वीकारणारा पोलीस अधिकारी एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 04:21 PM2019-02-13T16:21:59+5:302019-02-13T16:25:58+5:30
आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. या लाचेची पहिला हप्ता घेताना म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
मुंबई - देवनार पोलीस ठाण्यात तक्रारदार, त्याचा भाऊ आणि मित्राविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील सर्व आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी तसेच आरोपींच्या विरोधात दाखल गुन्ह्यात सहकार्य करण्यासाठी पोलीस निरीक्षक दत्तात्रय गोविंद चौधरी (५०) यांनी ३ लाखांची लाच मागितली होती. या लाचेची पहिला हप्ता घेताना म्हणून ८० हजार रुपये स्वीकारताना चौधरी यांना एसीबीने रंगेहाथ अटक केली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार आणि त्याचा भाऊ, मित्र यांच्याविरोधात देवनार पोलीस ठाण्यात मारहाणीच्या गुन्ह्यांची नोंद आहे. या गुन्ह्यात तक्रारदारासह त्याच्या भावाला अटक केल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर झाला. मात्र या प्रकरणातून तक्रारदार आणि त्याच्या भावाला पूर्णपणे बाहेर काढण्यासाठी जामीन मिळवून देण्यासाठी चौधरी यांनी तक्रारदाराकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास या प्रकरणात अडकवण्याची धमकी चौधरी यांनी दिल्याचे तक्रारदाराने तक्रारीत म्हटलं होतं. तडजोडीअंती लाचेची रक्कम अडीज लाख इतकी ठरली. मात्र, तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्याने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे (एसीबी) तक्रार नोंदवली होती. त्यानुसार मंगळवारी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून चौधरी यांना लाचेचा पहिला हप्ता 80 हजार रुपये स्विकारताना रंगेहाथ अटक केल्याची माहिती एसीबीच्या सूत्रांनी दिली आहे.