मुंबई - बहुचर्चित पोलीस अधिकाऱ्याच्या मुलगा अथर्व शिंदे मृत्यू प्रकरणाचा तपास आठ महिने उलटले तरी रेंगाळला आहे. अथर्वच्या मृत्यूच्या आठ महिन्यानंतरही पोलिसांना ठोस पुरावा शोधून काढता आलेला नाही. पोलीस हत्येच्या अनुषंगाने या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, अथर्वची हत्या कशी झाली त्याचा कोणताही पुरावा पोलिसांकडे नाही. त्यामुळे या प्रकरणात अपघाती मृत्यू झाल्याचा निष्कर्ष पोलीस काढू शकतात.
अथर्वचे वडील पोलीस दलातच असून ते आर्थिक गुन्हे शाखेमध्ये पोलीस अधिकारी आहेत. आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्वचा मृतदेह सापडला होता. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहे. पोलीस आता फॉरेन्सि्क तज्ञाच्या एका अहवालाची वाट पाहत आहेत. त्यानंतर मृत्यू कसा झाला त्या निष्कर्षापर्यंत पोलीस पोहोचू शकतात. परिस्थितीजन्य पुरावे अथर्वची हत्या झाल्याच्या दाव्याला सिद्ध करत नाहीत. पोलिसांकडे जे पुरावे आहेत त्यावरुन तो एक अपघाती मृत्यू वाटतो असे एका अधिकाऱ्याने सांगितले. अथर्व पुण्यातील कॉलेजमधून साऊंड इंजिनिअरींगचे शिक्षण घेत होता. एका मित्राच्या बर्थ डे पार्टीला जाण्यासाठी म्हणून तो ७ मे रोजी आपल्या कांदिवली येथील घरातून बाहेर पडला. मात्र, घरी न परतल्याने त्याने वडिलांना संदेश पाठवून सकाळी घरी येणार असल्याची माहिती दिली होती. ९ मे रोजी आरे कॉलनीतील तलावाजवळ अथर्वचा मृतदेह सापडला होता. याप्रकरणी आरे पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आली होती.