हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, दोघा आयोजकांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2018 03:42 AM2018-11-05T03:42:53+5:302018-11-05T03:43:06+5:30

ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता.

 Police raid on Hukka Party, two organizers arrested | हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, दोघा आयोजकांना अटक

हुक्का पार्टीवर पोलिसांचा छापा, दोघा आयोजकांना अटक

Next

नवी मुंबई -  ऐरोली येथे चाललेल्या बेकायदेशीर हुक्का पार्टीवर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री कारवाई केली. त्याठिकाणी ६० हून अधिक मुले पार्टीसाठी जमलेली होती. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुलांसह ९ मुलींचा समावेश होता. त्या सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सोडून देण्यात आले असून, दोघा आयोजकांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
ऐरोली येथील खासगी जागेत हुक्का पार्टीचे बेकायदेशीरपणे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीचे काही ठिकाणी बॅनरदेखील लावण्यात आलेले, शिवाय ठरावीक तरुण-तरुणींना निमंत्रित करण्यात आले होते. यासाठी मुलींना व जोडप्यांना प्रवेश मोफत होता, तर एकट्या मुलांसाठी हजार रुपये शुल्क ठेवण्यात आलेले.
मध्यरात्रीपर्यंत चालणाऱ्या या पार्टीला हेलोवीन पार्टी असे नाव देण्यात आले होते. याची माहिती रबाळे पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अजय कुंभार यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी खात्री केली असता, ऐरोली सेक्टर ९ येथील खासगी जागेत मोठ्या संख्येने तरुण पार्टीसाठी जमल्याची त्यांना माहिती मिळाली. त्यानुसार उपआयुक्त डॉ. सुधाकर पठारे, सहायक आयुक्त प्रदीप जाधव, वरिष्ठ निरीक्षक संंजय गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली गोडसे यांच्या पथकाने रात्री ११ वाजण्याच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकला.
या वेळी त्या ठिकाणी बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी सुरू असल्याचे आढळून आले. शिवाय पार्टीसाठी दारूचा देखील साठा त्या ठिकाणी करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पार्टीसाठी जमलेल्या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. त्यामध्ये ७ अल्पवयीन मुले व ९ मुली आढळून आल्या.
पार्टीत नशेसाठी अमली पदार्थांचा वापर झाला आहे का हे तपासणीसाठी सर्वांची वैद्यकीय चाचणी करून सर्वांना सोडून देण्यात आले. मात्र, चाचणीत ते दोषी आढळल्यास त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तर बेकायदेशीरपणे हुक्का पार्टी आयोजित केल्याप्रकरणी करण नरेश पाटील (२४) व मयूर भीमराव मढवी (२५) यांना अटक करण्यात आली आहे. करण मढवीच्या खासगी जागेत ही पार्टी सुरू होती. त्याठिकाणावरून डीजे मशिन, ७ हुक्का व ४ फ्लेवर तसेच इतर साहित्य असा ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
पार्टी आयोजनामागचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे; परंतु या हुक्का पार्टीमागे राजकीय व्यक्तींचा हात असल्याची शंका वर्तवली जात आहे. त्यानुसार रबाळे पोलीस अधिक तपास करत आहेत.

Web Title:  Police raid on Hukka Party, two organizers arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.