मुंबई - अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या एका ‘स्पा’वर छापा मारत सात जणांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ने केली असून, यात पाच तरुणींचा समावेश आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस चौकशी करीत आहेत.एमआयडीसीच्या अंतरिक्ष ठाकूर हाउसमध्ये स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या कक्ष ९ ला मिळाली. त्यानुसार प्रभारी महेश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहायक पोलीस निरीक्षक जाधव तसेच पथकाने ‘मॅग्नेट स्पा’मध्ये छापा मारला. तेव्हा त्या ठिकाणी पाच तरुणी त्यांना सापडल्या. यांच्यासह एक व्यवस्थापक आणि ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले. मात्र याचा मालक कुणाल राणा हा पसार झाला असून, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या सर्वांना पुढील कारवाईसाठी एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.