खाकी बदनाम! पोलिसाचाच विवाहितेवर बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2022 07:17 AM2022-01-03T07:17:09+5:302022-01-03T07:17:31+5:30
पेण पोलिसांनी केली अटक ; चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी
लोकमत न्यूज नेटवर्क
वडखळ : पोलीस असल्याचा गैरफायदा घेत पती व मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची घटना पेणमध्ये घडली आहे. विवाहितेशी तिच्या संमतीशिवाय मागील सहा वर्षांपासून शारीरिक संबंध ठेवणाऱ्या पोलीस हवालदार श्याम जाधव याच्याविरोधात पेण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अलिबाग येथील मुख्यालयात कार्यरत असलेला हवालदार जाधव याने पोलीस असल्याचा फायदा घेत पेण शहरातील एका विवाहितेला तिच्या पतीला व मुलांना जीवे मारण्याची धमकी देऊन २०१५ पासून जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याची तक्रार या महिलेने पेण पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री दाखल केली आहे. पेण पोलिसांनी जाधव याला अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता त्याला चार जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
जाधव याच्याविरोधात ही महिला पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेली असता आरोपीने पेण पोलीस ठाण्यात जाऊन गोंधळ घातला. ड्युटीवर असलेल्या महिला पोलीस नाईक व महिला पोलीस उपनिरीक्षक यांना शिवीगाळ केली. यावेळी पोलीस नाईक गुजराथी व पोलीस शिपाई मढवी हे समजावण्यासाठी गेले असता त्यांनाही मारहाण केली.
पोलिसांनाही धक्काबुक्की
श्याम जाधव याला तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात नेत असताना त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. याप्रकरणीदेखील आरोपी श्याम जाधव याच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलीस ठाणे अधिक तपास करत आहे.