पाच लाखाची लाच घेताना पोलीस उपनिरीक्षक जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 06:57 PM2020-06-21T18:57:17+5:302020-06-21T18:58:01+5:30
तक्रार अर्जावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली. त्यानंतर पाच लाखाची लाच स्वीकारताना त्या उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले.
पिंपरी : तक्रार अर्जावरून कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने लाच मागितली. त्यानंतर पाच लाखाची लाच स्वीकारताना त्या उपनिरीक्षकाला रंगेहात पकडले. पुणे लाच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शनिवारी (दि. २०) ही कारवाई केली.
फारुख याकूब सय्यद सोलापूरे (वय ५६) असे रंगेहाथ पकडलेल्या उपनिरीक्षकाचे नाव आहे. चिखली पोलीस ठाण्याअंतर्गत साने पोलीस चौकीला ते नेमणुकीस आहेत. तक्रारदार यांनी चिखलीतील मोरेवस्ती परिसरात इमारत बांधली आहे. त्या इमारतीमधील सहा फ्लॅट त्यांनी विकले. मात्र, त्या संबंधित फ्लॅट धारकांकडून पैसे येणे बाकी होते. त्या संदर्भात तक्रारदार याने चिखली पोलीस ठाण्यात २९ मे २०२० मध्ये अर्ज केला होता. त्या अर्जावर चौकशी करण्याचे काम तेथे नेमणुकीस असलेले उपनिरीक्षक सोलापूरे याच्याकडे देण्यात आले. दरम्यान, त्या अर्जावरून असलेल्या तक्रारीवरून त्या फ्लॅट धारकांकडून पैसे काढून देण्यासाठी तसेच, त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यासाठी तक्रारदारांकडे पाच लाखाची मागणी केली. त्याची माहिती तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंध विभागाकडे दिली. त्यानुसार उपनिरीक्षक सोलापुरे पाच लाखाची रक्कम स्वीकाराताना रंगेहात पकडले गेले.