पोलीस माने मला त्रास द्यायचा, गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:40 AM2021-08-27T11:40:32+5:302021-08-27T11:41:10+5:30
सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी आम्हाला सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. वर्षभर आम्ही न्यायासाठी राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे उंबरे झिजवले. सुनील माने मला सतत फोन करून मानसिक त्रास देत होता, तर चिमाजी आढाव आणि अकबर पठाण माझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत असल्याचा आरोप खंडणी प्रकरणातील तक्रारदार गुरुशरणसिंह चौहानच्या पत्नीने केला आहे.
चौहान यांच्या म्हणण्यानुसार, हे तिन्ही पोलीस अधिकारी माझ्या पतीला सतत त्रास देत होते. ‘तुम्ही मोठे व्यावसायिक आहात त्यामुळे तुम्ही आम्हाला पैसे द्यायचे, अन्यथा तुम्हाला खोट्या आरोपात अडकवेन,’ अशी धमकी डीसीपी पठाण तसेच माने व आढाव यांच्याकडून दिली जात होती. मला सुनील माने वेळी अवेळी फोन करून माझा मानसिक छळ करायचा, तर पठाण व आढाव हे माझ्या नवऱ्याला खोट्या प्रकरणात अडकवेन, पत्नीवर गुन्हा दाखल करेन, अशी धमकी द्यायचे. पत्नीला पैसे आणायला सांग, असेही रात्री त्यांच्याकडून सांगण्यात येत होते. घर विका, दागिने विका; पण आम्हाला पैसे आणून द्या, असे म्हणत आमचे खच्चीकरण केले. आम्हाला घरातून बाहेर पडण्याची मुलांना बाहेर पाठविण्याची भीती वाटायची. रक्षणासाठी असलेलेच भक्षण करण्याचा प्रयत्न करू लागले तर दाद मागायची कोणाकडे, असा प्रश्न समोर होता.
...म्हणून घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव
- आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तात्कालिक गृहमंत्री अनिल देशमुख, पोलीस आयुक्त परमबीर सिंह, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे २०२० साली याबाबत तक्रार केली.
- कोणीच माझ्या मदतीला आले नाही. त्यामुळे आम्ही अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. सर्वोच्च न्यायालयाने अंधेरी कोर्टात जाण्याचा सल्ला देत न्याय न मिळाल्यास पुन्हा सर्वोच्च न्यायालयाकडे दाद मागण्याची मुभा दिली. त्यानंतर अंबोली पोलिसांनी आमची तक्रार दाखल केली, असे चौहान म्हणाल्या.