लग्नासाठी नोकरी न सोडणाऱ्या पोलीस तरुणीलाच खुनाची धमकी, विकृत तरुणाविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:13 AM2020-10-29T02:13:32+5:302020-10-29T02:15:28+5:30
Crime News : पोलीस खात्याची नोकरी न सोडल्यामुळे आधी लग्नाला नकार दिला. त्यानंतर पुन्हा नोकरी सोडण्याचीच अट घातल्यामुळे ठरलेले लग्न मोडले. त्यानंतरही दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह पतीचाही खून करील, अशी धमकी दिली.
ठाणे - पोलीस खात्याची नोकरी न सोडल्यामुळे आधी लग्नाला नकार दिला. त्यानंतर पुन्हा नोकरी सोडण्याचीच अट घातल्यामुळे ठरलेले लग्न मोडले. त्यानंतरही दुसऱ्याशी लग्न केल्यास तुझ्यासह पतीचाही खून करील, अशी धमकी देत मोबाईल स्टेटसवर अश्लिल मजकूर टाकणाऱ्या अमर गंगाधर जोंधळे (२९, रा. आजरसोंडा, जि. हिंगोली) याच्याविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे शहर पोलीस दलातील एका २५ वर्षीय तरुणीचे तिच्याच नात्यातील अमरशी प्रेमसंबंध होते.
दोन्ही कुटुंबीयांच्या संमतीने १७ फेब्रुवारी २०१९ रोजी त्यांचा साखरपुडा झाला. त्यानंतर त्याने नोकरी सोडली तरच लग्न करेल, असा आग्रह केला. त्यावरुन दोन्ही कुटुंबीयांच्या बैठकीत त्याची समजूत घालण्यात आली. तरीही त्याने हट्ट न सोडल्यामुळे दोघांनीही संपर्क तोडला. काही दिवसांनी पुन्हा त्याने नोकरीचा अडसर नसल्याचा बहाणा करीत लग्नाला तयारी दर्शविली. २७ जून २०२० ही लग्नाची तारीख ठरली. मात्र २ जून रोजी नोकरी न सोडल्यास लग्न न करण्याचा त्याने पुनरुच्चार केला. तिनेही लग्नाला स्पष्ट नकार दिला. यातूनच संतप्त झाल्यामुळे त्याने मोबाइल स्टेटसवर तिचे फोटो ठेवले. दुसऱ्याशी लग्न केल्यास खून करण्याची धमकीही त्याने दिली. याबाबत तिने रबाळे पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तरीही अमरकडून त्रास सुरुच होता.
मोबाइल नंबरही बदलला
आरोपी अमरपासून सुटकारा मिळवण्यासाठी पीडित तरुणीने मोबाइल क्रमांक बदलून अमरचा क्रमांकही ब्लॉक केला. तरीही त्याने २४ ऑक्टोबर रोजी मोबाइल स्टेटसवर तिच्याबद्दल अश्लील मजकूर टाकून तिची बदनामी केली. अखेरिस या पोलीस तरुणीने ठाणेनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम सोमवंशी यांनी सांगितले.