सागर दुबे, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: शहर पोलिसांसह वाहतूक पोलिसाने तत्परता दाखविल्याने सोमवारी एक मोठा अनर्थ टळला आणि दोघांचे प्राणही वाचले. वर्षभरापूर्वी झालेल्या मुलाच्या खुनातील संशयित आरोपींना दुपारी न्यायालयात पोलिस हजर करणार होते. 'खून का बदला खून' म्हणून न्यायालयाच्या बाहेरच दोघांवर गोळीबार करून त्यांचा खून करण्याचा बापाचा कट पोलिसांनी उधळून लावला आहे. हा संपूर्ण थरार सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास जिल्हा न्यायालयाच्या मागील बाजूस घडला.
दरम्यान, पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नातील बापाला पोलिसांनी पकडले असून त्याचा साथीदार मात्र तेथून पसार होण्यात यशस्वी झाला आहे. मनोहर आत्माराम सुरळकर (४६, रा. भुसावळ) असे अटक केलेल्याचे तर सुरेश रवी इंधाटे (रा. भुसावळ) असे फरार संशयिताचे नाव आहे. या कारवाईत पोलिसांनी एक गावठी पिस्तूल व पाच जीवंत काडतूस जप्त केले आहे.
काय होती घटना?
लहान मुलांच्या भांडणातून दोन वर्षापूर्वी भुसावळातील पंचशील नगरामध्ये कैफ शेख जाकीर या तरूणाचा खून झाला होता. या गुन्ह्यात धम्मप्रिया मनोहर सुरळकर (१८) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सप्टेंबर-२०२१ मध्ये धम्मप्रिया याची जामिनावर मुक्तता झाल्यावर मनोहर सुरळकर व धम्मप्रिया हे पिता-पुत्र घरी जात असताना सुनसगाव पुलाजवळ सिगारेट घेण्यासाठी थांबले. तेव्हा धम्मप्रिया याच्यावद दुचाकीवरून आलेल्या तिघांनी गोळीबार केला तर त्याच्या वडीलांवर चाकूने सपासप वार केले. या गोळीबारात धम्मप्रिया यांचा मृत्यू झाला होता. नशिराबाद पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी शेख शमीर उर्फ समीर शेख जाकीर आणि रेहानुद्दीन उर्फ भांजा नईमोद्दीन यांना अटक केली होती. डोळ्या देखत मुलाचा खून केला म्हणून वडीलांच्या मनात बदल्याची आग घुमसत होती.