अर्णब गोस्वामींना मोबाईल वापरायला देणे पडले महागात, पोलिसांना गमवावी लागली नोकरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2020 09:06 AM2020-11-13T09:06:48+5:302020-11-13T09:08:35+5:30
Arnab Goswami News : अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी दरम्यान, मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे.
मुंबई - अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी अटक करण्यात आलेले रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांची सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली आहे. दरम्यान अर्णब गोस्वामी यांना न्यायालयीन कोठडी दरम्यान, मोबाईल वापरायला देणे दोन पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलेच महाग पडले आहे. तुरुंगात कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास दिल्या प्रकरणी या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.
अर्णब गोस्वामी यांना अटक करून अलिबाग येथील न्यायालयासमोर हजर करण्यात आल्यानंतर गोस्वामी यांना न्यायालीन कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, न्यायालयीन कोठडीसाठी अर्णब गोस्वामी यांची रवानगी अलिबाग येथील शाळेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या तुरुंगात करण्यात आली होती. मात्र तिथे असताना अर्णब गोस्वामी हे मोबाईल वापरत असल्याचे तसेच सोशल मीडियावर अॅक्टिव असल्याचे दिसून आले होते.
त्यानंतर या प्रकाराची गंभीर दखल घेत कारागृह प्रशासनाने या प्रकाराची खातेनिहाय चौकशी सुरू केली होती. तसेच तुरुंगात असलेल्या इतर कैद्यांकडेही याबाबत चौकशी करण्यात आली होती. त्यामधून दोन पोलीस कर्मचारी हे पैसे घेऊन कैद्यांना स्वत:चा मोबाईल वापरण्यास देतात, अशी माहिती समोर आली. त्यानंतर या प्रकरणी सुभेदार अनंत भेरे आणि पोलीस शिपाई सचिन वाडे यांना निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अर्णब गोस्वामी यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अर्णब गोस्वामी यांना ४ नोव्हेंबर रोजी मुंबई येथील घरातून अटक करण्यात आली होती.