राजकीय हत्या की आत्महत्या! नंदीग्राममध्ये घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला भाजपा कार्यकर्त्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 03:50 PM2021-04-01T15:50:35+5:302021-04-01T15:52:07+5:30
Murder or Suicide : पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
नंदीग्राम: पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये गुरुवारी एका भाजपा कार्यकर्ता घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. हाय प्रोफाइल सीटसाठी सुरु असलेल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी सकाळी नंदीग्रामच्या भेकुटिया भागात उदय दुबे हे घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. भाजपा नेते शुभेंद्रू अधिकारी यांच्या समर्थनार्थ या परिसरात प्रचार करणारे सुपरस्टार मिथुन चक्रवर्ती यांनी रोड शोमध्ये भाग घेतल्यानंतर दुबे यांना 30 मार्चपासून तृणमूल कॉंग्रेसकडून धमक्या मिळत होत्या, असा आरोप भाजपा नेत्यांनी केला.
टीएमसीच्या गुंडांनी त्याची गळफास लावून हत्या केली असावी असा आरोप त्यांनी केला. टीएमसीने हे आरोप फेटाळून लावत मृत्यूवरुन राजकारण केल्याबद्दल भाजपावर निशाणा साधला. टीएमसीच्या एका वरिष्ठ नेत्याने असा दावा केला आहे की, "कौटुंबिक समस्येमुळे दुबे यांनी आत्महत्या केली."
पोलिसांनी सांगितले की, अपमृत्यूचा मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोस्टमॉर्टम रिपोर्ट मिळाल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण कळू शकेल. पोलीस पुढे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी या ठिकाणी केंद्रीय सैन्याने तैनात केली आहे. नंदीग्राममध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांचे माजी सहयोगी आणि भाजपाचे उमेदवार शुभेंद्रू अधिकारी यांच्यात राजकीय स्पर्धा आहे, त्यानुसार येथे कलम १४४ म्हणजेच जमावबंदी लागू आहे.