गणेशोत्सवादरम्यान गोव्यात अतिरेकी कारवाया होण्याची शक्यता नाकारता येत नाही : डीआयजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 08:57 PM2019-08-28T20:57:30+5:302019-08-28T21:02:19+5:30
चतुर्थीसारख्या सणांच्यावेळी अशी शक्यता अधिक असते.
पणजी - गोवा हे जागतिक पर्यटन केंद्र असल्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात गोव्यात अतिरेकी कारवायांची शक्यता नाकारता येत नाही अशी असे पोलीस उपमहानिरीक्षक परमादित्य यांनी विशेष पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. राज्यात सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
उपमहानिरीक्षक परमादित्य म्हणाले, ‘गोवा हे अंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन केंद्र आहे. जगभरातील लोक गोव्यात येतात. त्यामुळे अतिरेक्यांचेही लक्ष्य गोवा असू शकते आणि गोव्यात घातपाती कारवाया घडवून आणण्यासाठी अतिरेकी संघटना कार्यरत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. चतुर्थीसारख्या सणांच्यावेळी अशी शक्यता अधिक असते. गोवा पोलिसांकडून सर्व प्रकारचे धोके लक्षात घेवून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
लोकांनीही सतर्क रहावे. संशयास्पद हालचाली दिसल्यास लोकांनी त्वरित पोलीसांना माहिती द्यावी. तसेच राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सुरक्षा राखण्यासाठी आणि कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. गणेशोत्सव मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावावेत. कॅमऱ्यातील रेकॉर्डिंग किमान १५ दिवस ठेवावे असेही आवाहन त्यांनी केले.
चतुर्थीच्या दिवसात पोलिसांच्या गस्ती अधिक होतील. शहरातून लोक आपल्या गावी जात असल्यामुळे शहरातील बंद घरांना चोरटे लक्ष्य करतात. अशा ठिकाणी पोलिसांच्या गस्ती वाढविल्या जातील. सुरक्षा कामात केंद्रातून अतिरिक्त पोलीस मागितले जाणार नाहीत, परंतु गोवा पोलीस खात्याचे सर्व मनुष्यबळ कामाला लावले जाईल. राखीव पोलीस, आयआरबीच्या कंपन्या आणि होमगार्डना सुरक्षा कामासाठी उतरविले जाईल असे त्यांनी सांगितले.