Video : शाब्बास महिला पोलिसांनो! हार्टअॅटॅक आलेल्या प्रवासी महिलेचे वाचवले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 08:46 PM2019-07-05T20:46:08+5:302019-07-05T20:48:34+5:30
अस्वस्थ झालेल्या महिलेला कर्तव्यावर असलेल्या दादर लोहमार्गच्या महिला अंमलदारांनी पाहिले.
मुंबई - दादर रेल्वे स्थानकात प्रवासादरम्यान हार्टअॅटॅक आलेल्या महिलेला तात्काळ उपचार मिळाल्याने तिचे प्राण वाचले. दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या महिला अंमलदारांनी प्रसंगावधान राखल्याने महिलेचे प्राण वाचले. २५ जून २०१९ रोजी दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ वर सकाळी १० वाजताच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणरी धिमी लोकल आली. त्यावेळी गार्डच्या जवळील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या अंदाजे ३० ते ३५ वर्षीय महिलेच्या छातीत अचानक दुखू लागले. अस्वस्थ झालेल्या महिलेला कर्तव्यावर असलेल्या दादर लोहमार्गच्या महिला अंमलदारांनी पाहिले. क्षणाचा विलंब न लावता, हमाल आणि स्ट्रेचरची वाट न पाहता महिला अंमलदारांनी त्या महिलेला उचलून फलाट ६ वरील आपत्कालीन उपचार केंद्रात आणले. तात्काळ उपचार मिळाल्याने प्रवासी महिलेचे प्राण वाचले. महिलेचे प्राण वाचवल्यामुळे महिला हवालदार (बक्कल नं. 2937) कांबळे, महिला हवालदार (बक्कल नं 1069) जाधव, महिला पोलीस नाईक (बक्कल नं. 2313) गाडे , महिला पोलीस नाईक (बक्कल नं. 2944) सानप, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं.1088) परुळेकर, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं.1591) ओझरकर, महिला पोलीस शिपाई (बक्कल नं 346) वाघमारे आदींचे दादर लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी कौतुक केले. तसेच महिलेच्या कुटुंबीयांनी व प्रवाशांनी महिला अंमलदारांच्या कामगिरीबद्दल प्रशंसा केली.