लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबै बँकेतील बोगस मजूर प्रकरणात भाजप नेते प्रवीण दरेकर यांना माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पोलिसांनी ३५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि दोन जामीनदारांच्या हमीवर दरेकर यांना जामीन मंजूर केला आहे.
मुंबै बँकेच्या मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला आहे. दरेकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दरेकर यांना दिलासा देत या गुन्ह्यात अटक झाल्यास तात्काळ सुटका करण्याचे आदेश देत अटकपूर्व जामीन मंजूर केला होता.
दरेकर शुक्रवारी माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलिसांनी दरेकर यांना अटक दाखवून तात्काळ जामीन मंजूर केला आहे. अटकेच्या वृत्ताला पोलीस उपायुक्त एन. बालाजी यांनी दुजोरा दिला आहे.
दरेकर यांचे सरकारवर आरोप पोलीस ठाण्यात हजर राहण्यापूर्वी दरेकर यांनी सरकारने राजकारण करत आपल्याला अडकवल्याचे म्हटले आहे. पोलीस ठाण्यात जास्तीत जास्त हजेरी लावण्याची ड्यूटी आमच्यामागे लावली जात आहे. आपल्याला न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. फक्त कायदेशीर प्रक्रियेची औपचारिकता पूर्ण करण्यासाठी पोलीस ठाण्यात जात असल्याचे नमूद केले होते. मुंबई जिल्हा बँकेवर संचालकपदी विराजमान होऊन महापालिकेकडून अटींचे उल्लंघन होत आहे. विष्णू घुमरे यांचेदेखील निलंबन महापालिकेने केले आहे, असे ते म्हणाले.