मनपा कर्मचारी असल्याची बतावणी करत सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरातील चौदा तोळे सोनं पळवलं
By रूपेश हेळवे | Published: March 10, 2023 06:22 PM2023-03-10T18:22:55+5:302023-03-10T18:24:19+5:30
या प्रकरणी दिनेश सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे.
सोलापूर : महानगरपालिकेचे कर्मचारी असून घरातील ड्रेनेज पाईप पहायचे आहेत, अशी बतावणी करत वृद्ध दाम्पत्याच्या घरातील कपाटातील साडे चौदा तोळे सोने दोघा चोरांनी दिवसाढवळ्या चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी घडली. ही घटना दमानी नगरातील गडदर्शन सोसायटीतील दिनेश सुरवसे या सेवानिवृत्त प्राध्यापकाच्या घरी घडली. ही घटना पोलिसांना कळताच घटनास्थळी श्वान पथकासह पोलिसांचे पथक दाखल झाले. या प्रकरणी दिनेश सुरवसे यांनी फौजदार चावडी पोलिसात तक्रार दिली आहे.
शुक्रवारी सकाळी दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात इसमांनी दिनेश उर्फ धोंडिबा सुरवसे यांच्या घरात प्रवेश करत, त्यांच्या घरातील ड्रेनेजचे पाईप पाहायचे आहे, असे सांगितले. त्यानंतर वृध्दांना बोलण्यात गुंतवले. दरम्यान, दुसऱ्याने थेट घरातील उघड्या कपाटातून सोने ठेवलेली पर्स चोरली. त्यानंतर संशय आलेल्या दिनेश सुरवसे यांनी आतल्या खोलीत जाऊन कपाट पाहिले असता त्यातील सोन्याची पर्स त्यांना दिसली नाही. त्यांनी तत्काळ आपल्या मुलाला फोन करत झालेली घटना सांगितली. घटनेची माहिती कळताच फौजदार चावडीचे पोलीस अधिकारी उदयसिंह पाटील, विकास देशमुख, डीबीचे शंकर धायगुडे आणि सतीश भोईटे तसेच गुन्हे शाखेचे अधिकारी हे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून आरोपीचा शोध सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.