काही खरे नाही, चक्क मरण पावलेल्या व्यक्तीला केले आरोपी; एकाच गुन्ह्यासाठी दोनदा FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:04 AM2022-01-14T09:04:05+5:302022-01-14T09:04:10+5:30
मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली.
मुंबई : मालवणी पोलिसांनी तीन वर्षांत एकाच व्यक्तीवर एकाच गुन्ह्यात दोनदा दखलपात्र (एफआयआर) नोंद केला आहे. मुख्य म्हणजे गेल्या आठवड्यात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरमध्ये पोलिसांनी गेल्या वर्षी कोरोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचेही नाव नमूद केले. हा गुन्हा बोरिवली तहसीलदार कार्यालयाच्या विभागीय अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीनुसार करण्यात आल्याने स्थानिक तक्रारदारांचे आणि अधिकाऱ्यांचे यात साटेलोटे असल्याचा आरोप वकिलाकडून करण्यात आला आहे.
मालवणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची तक्रार बोरिवली तहसीलदार कार्यालयाला मिळाली. याप्रकरणी बोरिवली तहसीलदार कार्यालयातील विभागीय अधिकारी संतोष लोकरे यांनी २७ डिसेंबर,२०२१ रोजी घटनास्थळी भेट दिल्यावर केलेल्या तक्रार अर्जावरून मालवणी पोलिसांनी ५ जानेवारी रोजी त्रिलोकनाथ तिवारी ऊर्फ मौजे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यात बाबुमियाँ सरदार आणि शशी दुबे ही नावे आरोपी म्हणून जोडण्यात आली.
स्थानिकांकडे चौकशी केली असता झोपड्या या तिघांच्या असल्याचे समजल्याचे लोकरे यांनी पोलिसांना सांगितले. मात्र, तिवारी याच्यावर याच गुन्ह्यात २०१९ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या तक्रारीवरून मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. जिल्हाधिकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे कब्जा केल्याच्या आरोपावरून त्याला अटकही करण्यात आली होती. तर दुबे हा कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्याच्या उत्तर प्रदेश येथील गावी असताना ३० एप्रिल २०२१ रोजी त्याचा मृत्यू झाला. मात्र, या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव दुसऱ्या एफआयआरमध्येही टाकत मालवणी पोलिसांनी कलम ४४१ (जो कोणी गुन्हा करण्याच्या हेतूने दुसऱ्याच्या ताब्यातील मालमत्तेमध्ये किंवा त्याच्या ताब्यात प्रवेश करतो), ४४७ (गुन्हेगारी घुसखोरी) आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. सरकारी यंत्रणेची दिशाभूल करून पिळवणूक करण्याच्या उद्देशाने काही खोडकर घटक हे प्रकार करत असून अधिकाऱ्यांचेही त्यांना पाठबळ असल्याचा संशय यातून व्यक्त केला जात आहे.
मग ‘त्याचा’ मृत्यू झाल्याचे नाही समजले?
‘माझ्या अशिलावर मालवणी पोलिसांनी दुसरा एफआयआर दाखल करण्यापूर्वी स्वत:च्या नोंदी तपासल्या नसल्याचे दिसून येते. त्यांनी २०१९ मध्ये त्याच गुन्ह्यासाठी एफआयआर दाखल करत कलम ४४७ अंतर्गत अटक केली ज्यात त्याची जामिनावर सुटका झाली. या खटल्यात आरोपपत्रही दाखल केले. मात्र, २०२१ मध्ये तहसीलदार कार्यालयातून आलेल्या अधिकाऱ्यांनी सदर ठिकाणी भेट न देताच निव्वळ स्थानिक तक्रारदाराच्या सांण्यावरून तक्रार केल्याचा संशय मला आहे. कारण त्यांनी जर भेट दिली असती तर दुबे यांच्या मृत्यूबाबत त्यांना माहिती मिळाली असती. त्यानुसार स्थानिक तक्रारदार आणि अधिकाऱ्यांमध्ये साटेलोटे असल्याचेच यातून समोर येत आहे’.
- विजय शुक्ला, आरोपी तिवारीचे वकील
बोरीवली तहसीलदारांचे ‘मौन’
ॲड. शुक्ला यांच्या आरोपाबाबत बाजू जाणून घेण्यासाठी ‘’लोकमत’’ प्रतिनिधीने तहसीलदार विनोद धोत्रे यांना फोन आणि मेसेजवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी फोन घेतला नाही. तसेच मेसेजला देखील उत्तर दिले नाही.