तुरुंगातील अंथरुणावरून कैदी एकमेकांशी भिडले, एकाने दुसऱ्याला छातीत चमचा खुपसून ठार मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2021 04:15 PM2021-10-08T16:15:51+5:302021-10-08T16:16:31+5:30
Crime News: पंजाबमधील नाभा-भवानीगड रोडस्थित नई जिल्हा जेलमध्ये दोन कैदी अंथरूण घालण्यावरून एकमेकाशी भिडले. हा वाद एवढा वाढला की, एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या छातीत चमचा खुपसून त्याला ठार मारले.
चंदिगड - पंजाबमधील नाभा-भवानीगड रोडस्थित नई जिल्हा जेलमध्ये दोन कैदी अंथरूण घालण्यावरून एकमेकाशी भिडले. हा वाद एवढा वाढला की, एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या छातीत चमचा खुपसून त्याला ठार मारले. या कैद्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (Prisoners confronted each other from prison bars, one stabbing the other in the chest)
मृत कैद्याचे नाव सुखजिंदर सिंग उर्फ सुखा असे आहे. तर आरोपी कैद्याचे नाव सोनू आहे. तुरुंग प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन्ही कैद्यांमध्ये अंथरून घालण्यावरून भांडण झाले होते. दोन्ही कैदी हे एनडीपीएस अॅक्ट अन्वये तुरुंगात बंद होते. दोघांमधील भांडण मिटवण्यात आले होते. मात्र सोनूने अचानक चमच्याने सुखाच्या छातीत वार केला. हा चमचा थेट सुखाच्या हृदयात घुसला. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. मृतदेह रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे. तसेच त्याची माहिती सिटी पोलिसांना देण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपी कैद्यावर हत्येचा गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरू केली आहे.
तुरुंगात कैद्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना नाही आहे. तत्पूर्वीही २०१९ मध्ये नाभा तुरुंगात बंद असलेल्या एका कैद्याची इतर दोन कैद्यांनी हत्या केली होती. मृत कैद्याची ओळख मोहिंदरपालसिंग बिट्टू अशी झाली होती. मोहिंदरपालसिंग बिट्टू डेरा सच्चा सौदाच्या ४५ सदस्यांच्या कमिटीचा सदस्य होता. रिपोर्टनुसार मोहिंदरपालसिंग बिट्टूचे काही कैद्यांसोबत भांडण झाले होते. त्यानंतर त्याच्यावर दोन अन्य कैद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये मोहिंदरपाल सिंग गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याचा मृत्यू झाला. नाभा जेलमधील हत्येप्रकरणी पंजाब सरकारने तुरुंगातील चार सिनियर ऑफिसर्सना सस्पेंड केले होते. यामध्ये जेल अधीक्षक, उप जेल अधीक्षक आणि २ जेल वॉर्डनचा समावेश होता.