मनीषा म्हात्रेमुंबई : राज्यातील कारागृहांतील कैद्यांचा मानसिक ताण दूर करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार कैद्यांना आता महिन्यातून तीनवेळा फोनद्वारे कुटुंब, वकील यांच्याशी संपर्क करता येणार आहे. ज्या कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत अशा कैद्यांसाठी कारागृह प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यात एकूण ६० कारागृहे असून यात ९ मध्यवर्ती, ३० जिल्हा, २० खुली कारागृहे व १ किशोर सुधारालय आहे. यामध्ये एकूण ४१ हजार ९८० कैदी आहेत. अनेकदा परराज्यात तसेच, दूर राहण्यास असल्यामुळे कैद्यांचे नातेवाईक अथवा वकील हे प्रत्यक्ष भेटीसाठी कारागृहात येत नाहीत. अशावेळी कैद्यांमध्ये नैराश्य वाढू शकते. यासाठी २०१४ पासून कैद्यांसाठी दूरध्वनी सुविधेची उपाययोजना करण्यात आली आहे.
ज्या कैद्यांचे नातेवाईक भेटीस येत नाहीत, अशाच कैद्यांना किंवा क्वचितच भेट होते, अशाच कैद्यांना महिन्यातून ३ वेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी १० मिनिटे उपलब्ध करून देण्यात यावी, असे आदेश कारागृह विभागाचे प्रमुख अमिताभ गुप्ता यांनी दिले आहेत. याकरिता सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, तसेच स्थानिक परिस्थितीनुसार वकील भेटीबाबत कारागृह अधीक्षक हे याबाबत अंतिम निर्णय घेतील असेही कारागृह विभागाने नमूद केले आहे.
याच कैद्यांना फायदाज्या बंद्यांचे नातेवाईक भेटीस येत नाहीत, अशाच बंद्यांना किंवा क्वचितच मुलाखत होते, अशाच बंद्यांना महिन्यातून ३ वेळा दूरध्वनी सुविधा प्रत्येकी १० मिनिटे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
आधी करू शकत होते दोनदा कॉल ज्या कैद्यांचे वकील सकाळी ९ ते १०.३० या कालावधीत भेटू शकतात त्यांना वगळून ज्यांचे वकील समक्ष भेटीस येत नाहीत, त्यांनाच महिन्यातून दोनदा दूरध्वनीची सुविधा दिली होती.
दूरध्वनी सुविधा आणखीन सुलभ करत, त्यात वाढ करण्यात येणार आहे. ज्या कैद्यांचे नातेवाईक दूर आहेत. भेटी शक्य होत नाहीत. त्या कैद्यांचे नैराश्य कमी होण्यास मदत होईल. - अमिताभ गुप्ता, अप्पर पोलिस महासंचालक, कारागृह विभाग