वसई - वसईतील शिधावाटप केंद्रात येणारा रॉकेल केवळ काळ्याबाजारात नव्हे तर चक्क गावठी दारू बनविण्यासाठी वापरला जात असल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी नालासोपारा पश्चिमेच्या कळंब येथे छापा मारून ७०० लिटर रॉकेल आणि दारूसाठी लागाणारा २२ टन काळा गूळ जप्त केला आहे.
गावठी आणि हातभट्टीच्या दारूवर बंदी आहे. मात्र वसई विरारच्या विविध भागात मोठ्या प्रमाणावर अशी बेकायदेशीर दारू बनविण्यात येते. जंगलाचा भाग आणि खाडीकिनारी अशा प्रकारची गावठी दारू बनवली जात असते. यासाठी काळा गूळ वापरला जातो. पालघर स्थानिक गुन्हे शाखेच्या (पालघर) विभागाने नालासोपारा पश्चिमेच्या कळंब गावातील एका ठिकाणी असलेल्या गोदामात छापा घातला आणि या ठिकाणी दडवून ठेवलेलला २२ टन काळ गूळ जप्त केला. यावेळी शिधावाटप केंद्रात वितरणासाठी आणलेलेल ७२० लिटर रॉकेलही जप्त केले. याप्रकरणी आऱोपीवर पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमन सन १९४९ चे कलम २ व पोटकलम २८ मधील कलम ६१ अनुसार तसेच जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ व ७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.
दारूच्या निर्मितीसाठी काळा गूळ वापरला जातो. एका गोदामात कर्नाटकातून आणलेला काळा गूळ दडवून ठेवला होता, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांनी दिली. शिधावाटप केंद्रातील रॉकेलचा काळाबाजार होत असून हे रॉकेल दारूसाठी वापरले जात असल्याचे ते म्हणाले. कबाडी यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक तुषार माळोदे, पोलीस उपनिरीक्षक सुभाष बन, सुरेंद्र शिवदे, सुर्यवशी, सचिन पाटील आदींच्या पथकाने ही कारवाई केली.