ठाणे: एकीकडे मुंबईचे पोलीस आयुक्त परमवीरसिंग हे वादग्रस्त ठरल्यामुळे त्यांची उचलबांगडी झाली. मुंबई खालोखाल राज्यात ठाण्याच्या आयुक्त पदासाठीही लॉबिंग आणि रस्सीखेच असते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ मर्यादीत, मुंबई या पदावर पदोन्नतीने पदस्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदासाठीही राजेंद्र सिंग यांच्यासह चार नावांची जोरदार चर्चा गृह खात्यामध्ये सध्या सुरु आहे.
फणसळकर यांची 31 जुलै 2018 रोजी ठाण्याचे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. त्यांचा कार्यकाळ गेल्या वर्षीच संपूष्टात आला होता. परंतू, त्यांची ठाण्यातील उत्तम कामगिरी आणि कोरोना काळात त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी वर्गाने चांगल्या तऱ्हेने हाताळलेली ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य शासनाने त्यांची बदली न करता मुदतवाढ दिली होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयपीएस) अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असलेल्या फणसळकर यांच्यासह रेल्वेचे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई आणि स्पेशल ऑपरेशन्सचे आतिरिक्त पोलीस महासंचालक के. वेकटेशम या तिघांचीही पोलीस महासंचालकपदी (डीजी) बढती जवळपास निश्चित झाली आहे. त्यावर राज्य शासनाकडून फक्त अधिकृत शिक्कामोर्तब होणो बाकी आहे. जर ही बढतीची घोषणा झाली तर ठाण्याचे आयुक्तपद हे अतिरिक्त पोलीस महासंचालक दर्जाचे असल्यामुळे फणसळकर यांची बदलीही होणो क्रमप्राप्त आहे. सध्या हेमंत नगराळे यांच्याकडे अलिकडेच महासंचालक दर्जाचे असलेल्या मुंबईच्या पोलीस आयुक्त पदाची धुरा राज्य सरकारने परमवीर सिंग यांच्या उचलबांगडीनंतर सोपविली आहे.
हे होऊ शकतात ठाण्याचे आयुक्त?फणसळकर यांची बढतीवर बदली झाली तर त्यांच्या जागी राज्याच्या कायदा व सुव्यवस्था सांभाळणारे अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग (1989 आयपीएस बॅच), दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजित सिंग (1990), आस्थापना विभागाचे प्रमुख कुलवंत कुमार सरंगल यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होऊ शकते. त्यातही भूषणकुमार उपाध्याय (1989) हेही बढतीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांची जर बढती आणखी रखडली तर त्यांचीही ठाण्याच्या आयुक्तपदी वर्णी लागण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.