तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:58 PM2022-08-01T23:58:23+5:302022-08-01T23:59:47+5:30

शनिवारी मध्यरात्रीपासून महिला होती बेपत्ता

Pune Yerawada Crime News Shocking as body of a woman was found near the Tarakeshwar hill | तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ

googlenewsNext

येरवडा: तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सोमवारी सायंकाळी आढळला. गीता राजेश कुंभार (वय ४६, रा. ठाकरसी हिल पाण्याच्या टाकीजवळ, तारकेश्वर मंदिर पायथा येरवडा) असे मृत महिलेचे नाव आहे. पहिल्याच श्रावणी सोमवारी घडलेल्या या घटनेमुळे येरवडा परिसरात खळबळ निर्माण झाली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास तारकेश्वर टेकडी येथील जडपामध्ये एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह पडला असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाद्वारे देण्यात आली होती. घटनास्थळी तात्काळ भेट दिली असता महिला तारकेश्वर टेकडीच्या पायथ्याजवळ असणाऱ्या ठाकरसी हिल पाण्याची टाकी येथील राहणारी असल्याची माहिती मिळाली.

गीता कुंभार या मागील काही दिवसांपासून मानसिक दृष्टीने आजारी होत्या. त्यांच्यावर उपचारदेखील सुरू होते. शनिवारी रात्रीपर्यंत त्या घरात होत्या, मात्र मध्यरात्री नंतर त्या घरातून बेपत्ता झाल्या. दोन दिवस कुटुंबीयांनी शोध घेतल्यानंतर सोमवारी दुपारी येरवडा पोलीस स्टेशन येथे त्या बेपत्ता झाल्याची नोंद केली. दरम्यान, सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह पर्णकुटी पायथा येथील झाडीत कुजलेल्या अवस्थेत सापडला. घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी भेट दिली. श्वान पथकाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सदर महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ससून रुग्णालयात रवाना करण्यात आला असून शवविच्छेदनानंतरच नेमका प्रकार समजू शकेल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली.

तारकेश्वर मंदिर हा परिसर पांडवकालीन तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शेजारीच असणारा ऐतिहासिक  ठाकरसी बंगला तसेच शेजारी असणारी पुणे महापालिकेची ठाकरसी पाण्याची टाकी असा विस्तृत परिसर या ठिकाणी आहे. संपूर्ण परिसरात सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच प्रकारची काळजी घेतलेली दिसून येत नाही. धार्मिक स्थळ खाजगी बंगला तसेच महापालिका क्षेत्र या तीनही वेगवेगळ्या महत्त्वाच्या जागांमुळे सदर ठिकाणी सुरक्षितता महत्त्वाची आहे. परिसरात अनेक अपप्रवृत्तीचे लोक मद्यपानासह गैरप्रकार करत असतात. पूर्वी देखील अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना या परिसरात घडलेल्या आहेत. सुरक्षेच्या बाबतीत कोणत्याच ठोस उपाय योजना न केल्यामुळे असे गंभीर प्रकार वारंवार घडत आहेत. असे गंभीर दुर्दैवी प्रकार घडू नयेत यासाठी सुरक्षेबाबत कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे, अशी लोकांची भावना आहे.

Web Title: Pune Yerawada Crime News Shocking as body of a woman was found near the Tarakeshwar hill

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.