सरपंचावर जातीवाचक शेरेबाजी, दोघांविरुद्ध अॅट्रोसिटीअंतर्गत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2020 11:15 PM2020-07-08T23:15:52+5:302020-07-08T23:17:55+5:30
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व उपसरपंच यांनी सरपंचांना जातीवाचक बोलून अपमान केला. तर आणखी एकाने त्यांच्यावर सिद्ध न झालेले आरोप करून एकेरी उल्लेख करीत सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून बदनाम केले असल्याची घटना घडली आहे.
नेरळ : येथे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच हे अनुसूचित जमातीचे आहेत. मात्र ते आपले ऐकत नसल्याचा राग मनात धरून ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व उपसरपंच यांनी त्यांना जातीवाचक बोलून अपमान केला. तर आणखी एकाने त्यांच्यावर सिद्ध न झालेले आरोप करून एकेरी उल्लेख करीत सोशल मीडियावर पत्र व्हायरल करून बदनाम केले असल्याची घटना घडली आहे. या घटनेने व्यथित झालेल्या सरपंचांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दोघांवर अनुसूचित जाती जमाती अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील सगळ्यात मोठी व आर्थिक उलाढाल असलेली नेरळ ग्रामपंचायत आहे. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीची निवडणूकदेखील प्रतिष्ठेची समजली जाते. मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत येथील थेट सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी आरक्षित ठेवण्यात आले होते. तेंव्हा झालेल्या निवडणुकीत या ठिकाणी शिवसेनेचे अनुसूचित जमातीचे उमेदवार रावजी शिंगवा यांनी बाजी मारली होती. ५ जुलै रोजी विद्यमान सरपंच रावजी शिंगवा हे नेरळ-आंबेवाडी फाट्याजवळ उभे असताना माजी सदस्य व उपसरपंच केतन पोतदार हे त्यांच्याजवळ आले. आपल्या सांगण्याप्रमाणे शिंगवा हे ऐकत नाहीत याचा राग मनात धरून शिंगवा यांना जातीवाचक शब्द उच्चारून तेथे त्यांचा अपमान केला; तर दुसरीकडे रस्ता चोरी प्रकरणात ज्यांच्या घरापासून रस्ता मंजूर होता त्या अजित सावंत यांनी शिंगवा यांचा एकेरी शब्दात उल्लेख करून एकही आरोप सिद्ध नसताना बदनामीकारक वाक्य असलेले नेरळ शिवसेनेच्या बुरुजाजवळ भ्रष्टाचार करो ‘ना’ अशा मथळ्याचे पत्र लिहून ते सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यामुळे व्यथित झालेल्या नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा यांनी नेरळ पोलीस ठाणे गाठले. झालेल्या प्रकाराची फिर्याद त्यांनी नेरळ पोलीस ठाण्यात दिली. या अनुषंगाने नेरळ पोलीस ठाण्यात केतन पोतदार व अजित सावंत यांच्यावर अनुसूचित जाती/जमाती अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल घेरडीकर हे करीत आहेत.
परस्परांवर केले होते भ्रष्टाचाराचे आरोप
गेले सहा महिने ते ग्रामपंचायतीचा कारभार हा सहकारी सदस्य यांच्यासोबत करीत आहेत. मात्र मागील काही दिवसांत ग्रामपंचायत नेरळमधील सदस्य शिवाली रासम-पोतदार यांच्याकडून ग्रामपंचायतमधील १४ वित्त आयोगमधून बांधण्यात आलेल्या कचराकुंडी प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. वरिष्ठ पातळीवर त्याची चौकशीदेखील झाली; मात्र हे आरोप सिद्ध झाले नाहीत. दरम्यान, याच कालावधीत माजी सदस्य व उपसरपंच केतन पोतदार यांच्यावर त्यांच्या कार्यकाळात रस्ता न करता बिल काढल्याचा आरोप झाला होता. त्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.