अवैध सावकारी प्रकरणी जिल्ह्यात सहा ठिकाणी छापे, आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 08:04 PM2019-06-13T20:04:31+5:302019-06-13T20:04:45+5:30
महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर बुलडाणा, नांदुरा आणि मेहकर तालुक्यात सहा ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने १३ जून रोजी अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे.
बुलडाणा - महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अंतर्गत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारींच्या आधारावर बुलडाणा, नांदुरा आणि मेहकर तालुक्यात सहा ठिकाणी छापे टाकून सहकार विभागाने १३ जून रोजी अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे जप्त केली आहे. दीड महिन्यानंतर बुलडाणा जिल्ह्यात सहकार विभागाने केलेली ही दुसरी मोठी कारवाई म्हणावी लागले.
यामध्ये नांदुरा तालुक्यातील निमगाव येथील गणेश श्रीकृष्ण भोपळे व अवधा येथील कैलास किसन ढाले यांनी शंकर नरहरी गोंगे, श्रीकृष्ण नरहरी गोंगे व वसंत नरहरी गोंगे (रा. रामदल चौक, नांदुरा) तसेच निमगाव यांच्या विरोधात अवैध सावकारीची तक्रार केली होती. त्या आधारावर चिखली येथील सहाय्यक निबंधक जी. पी. साबळे, लेखा परीक्षक डी. पी. जाधव, जळगाव जामोद येथील सहाय्यक निबंधक कार्यालयातील डी. आर. ईटे यांनी येथे कारवाई केली. या कारवाईत त्यांनी कोरे मुद्रांक, तसेच खरेदी खत व अवैध सावकारीच्या तक्रारी संबंधाने दस्त झडती करून काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
दरम्यान बिरसिंग पूर येथील बळीराम नारायण बोराडे यांनी बुलडाणा येथील अतुल प्रभाकर लोखंडे (रा. वावरे ले-आऊट, बुलडाणा) यांच्या विरोधात अवैध सावकारीची तक्रार केली होती. त्या आधारे लोखंडे यांच्या राहते घरी खरेदी खत, करारनामा, कोरे मुद्रांक, कोरे चेक असे दस्तऐवज जप्त केले. ही कारवाई बुलडाणा येथील सहाय्यक निबंधक ए. बी. सांगळे व त्यांच्या सहकाºयांनी केली. तिसºया प्रकरणात मेहकर येथील अजगर खान अमजद खान यांनी मेहकर तालुक्यातील मोळा येथील गजानन माळेकर व जानेफळ येथील अमोल राजपूत यांच्या विरोधात तक्रार दिली होती. त्यानुषंगाने माळेकर आणि राजपूत यांच्या निवासस्थानी कोरे चेक, मुद्रांक, खरेदी खते असे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत श्रेणी एकचे सहकार अधिकारी जी. आर. फाटे (मेहकर) आणि लोणार येथील आर. आर. सावंत यांनी सहभाग घेतला होता.
दरम्यान, छाप्यादरम्यान झडतीमध्ये जप्त केलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने सध्या सहकार विभाग चौकशी करत आहे. ही कारवाई जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार खात्यातील प्रशासन व लेखापरिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाºयांच्या सहकार्याने १३ जून रोजी करण्यात आल्याचे सावकारी विभागाचे जिल्हा निबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले.
२६ एप्रिललाही झाली होती कारवाई
यापूर्वी दीड महिन्यापूर्वी सहकार विभागाच्या जवळपास ७० अधिकारी, कर्मचा-यांनी एकाच वेळी जिल्ह्यात दहा ठिकाणी छापे मारून अवैध सावकारी प्रकरणी धडक कारवाई केली होती. त्यानंतरची ही अलिकडील काळातील दुसरी मोठी कारवाई असल्याचे सुत्रांनी सांगितले.