मुंबई : मंत्रालयात नोकरभरतीचा घोटाळा ताजा असतानाच आता रेल्वे मंत्रालयाच्या नावाखाली केलेल्या नोकरभरतीत फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. १४ लाख रुपयांत रेल्वेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत मुंबईसह सातारा, लातूर भागातील १२ जणांची तब्बल दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी क्रॉफर्ड मार्केटमधील माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
चुनाभट्टी येथे राहणारे हरिश्चंद्र कदम यांचे वडील मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीला होते. २०१३ मध्ये वडिलांचे निधन झाल्यावर त्यांनी अनुकंपा तत्त्वावर पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरीसाठी प्रयत्न सुरू केले. याचदरम्यान त्यांची शिवाजी घणगे या वकिलाशी ओळख झाली. पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी मिळवून देण्यासाठी शिवाजीने कदम यांच्याकडून दोन लाख रुपये घेतले. मात्र, नोकरीचे काम न झाल्याने पैसे परत केले. त्यानंतर शिवाजीने कदम यांना रेल्वेतील नोकरीचे आमिष दाखवले. त्यासाठी त्याने २०२१ मध्ये १४ लाखांची मागणी केली. कदम यांनी त्यासाठी पैशांची जुळवाजुळव सुरू केली. त्यासाठी शेतजमीन विकली, राहत्या घरावर काही कर्जही घेतले आणि स्वत:चे व भाच्याचे असे २८ लाख रुपये शिवाजी घणगेकडे सोपवले. मात्र, पैसे देऊनही नोकरी न लागल्याने कदम यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. यामध्ये १२ जणांची १ कोटी ५६ लाख रुपयांना फसवणूक झाल्याचे उघडकीस आले असून, माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलिस अधिक तपास करत आहेत. या घोटाळ्यात रेल्वेसह अन्य कुठल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा हात आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत.
जॉइनिंग लेटरधक्कादायक बाब म्हणजे आरोपींनी रेल्वेचे जॉइनिंग लेटर, बनावट ऑर्डर कॉपी देत मुलाखतीबरोबर चेन्नईमध्ये एक महिन्याचे ट्रेनिंग करण्यास भाग पाडून तरुणांचा विश्वास संपादन केला. यामध्ये ग्रामीण भागातील तरुणांनी सरकारी नोकरीसाठी कुणी घर गहाण ठेवले, तर कुणी शेतजमिनी विकल्याचे समोर आले आहे. भुसावळ, चेन्नईला त्यांची ट्रेनिंगही झाली. रेल्वेची बनावट ऑर्डर देण्यात आली.
पैसे घेणारेच तक्रारदार...हरिश्चंद्र कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी घणगेला त्यांनी पैसे दिले होते. ते पैसे त्यांच्या मुलीच्या अकाउंटला पाठविण्यात आले. त्यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. मात्र, पैसे परत करण्याचा तगादा लावताच घणगेने आरोपी चौकडीला पैसे दिल्याचे सांगितले, तसेच आपल्या मुलीचीही फसवणूक केल्याचे नमूद करत ११ जून २०२२ रोजी तक्रार दिली.