पॉर्नोग्राफी प्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती आणि उद्योजक राज कुंद्रा याच्याबाबत निरनिराळे खुलासे होताना दिसत आहेत. फेब्रुवारी २०२१ पासून हे प्रकरण हळूहळू समोर येऊ लागलं होतं. यादरम्यान, राज कुंद्राचं नाव पहिल्यांदा समोर आलं होतं. आता या प्रकरणी आणखी एक मोठा खुलासा झाला आहे. पोलिसांनुसार जेव्हा फेब्रुवारी महिन्यात पॉर्नोग्राफी रॅकेटचा पर्दाफाश झाला होता, त्यावेळी राज कुंद्रानं आपला मोबाईल बदलला होता.
मुंबई क्राईम ब्रान्चचे अधिकारी या प्रकरणी बारीक तपास करत आहे. त्यांच्या माध्यमातून नवनवे खुलासे होताना दिसत आहेत. फेब्रुवारी महिन्यात ज्यावेळी पॉर्नोग्राफी रॅकेट समोर आलं त्यावेळी राज कुंद्रानं आपला फोन बदलला होता. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आता या प्रकरणी पोलिसांकडून खुलासा करण्यात आला आहे. राज कुंद्रा आणि रायन थोरपे याला मुंबईच्या क्राईम ब्रान्चच्या प्रॉपर्टी सेलनं अटक केली आहे.
सापडलं नवं बँक खातं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा विभागाला शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या एका ज्वाइंट अकाऊंटचा शोध लागला आहे. पंजाब नॅशनल बँकेत (PNB) शिल्पा आणि राज कुंद्रा यांचं ज्वाइंट अकाऊंट सापडलं आहे. राज कुंद्राची सारी अवैध पद्धतीनं कमावलेली कमाई याच अकाऊंटमध्ये जमा होत असल्याची माहिती समोर आली आहे. तसंच या अकाऊंटमध्ये आजवर कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. हॉटशॉट्स आणि बॉलीफेम या अॅप्समधून मिळणारी कमाई याच अकाऊंटमध्ये जमा केली जात होती, अशी माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे.
पीएनबी बँकेतील या वादग्रस्त बँक अकाऊंटमध्ये थेट व्यवहार न केले जाता विविध अकाऊंट्सच्या माध्यमातून पैसे जमा केले जात होते, असंही सांगितलं जात आहे. याशिवाय याच बँकेत राज कुंद्रा याचं सिंगल अकाऊंट देखील असल्याची माहिती समोर आली आहे. पण या खात्यात २०१६ पासून कोणताही व्यवहार झालेला नाही. इतकंत काय तर या खात्यात खातं सुरू ठेवण्यासाठीची आवश्यक रक्कम देखील जमा नाही. राज कुंद्राच्या बँक अकाऊंट्सचा शोधाशोध घेण्यासाठी गुन्हे शाखेनं चार सदस्यीय टीम नियुक्त केली आहे.