जयपूर-
राजस्थानमध्ये भ्रष्टाचार विरोधी पथकानं राजस्थान टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरुंना ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. राजस्थान युनिव्हर्सिटीच्या गेस्टहाऊसमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. कुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा वाढवण्याच्या मागणीसाठी २१ लाख रुपये मागितले होते. महत्वाची बाब म्हणजे ते यूपीएससी आणि राजस्थान लोक सेवा आयोगाच्या सिलेक्शन कमिटीचे सदस्य देखील राहिलेले आहेत.
भ्रष्टाचार विरोधी पथकाचे डीजी बीएल सोनी यांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्हाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे राजस्थान टेक्निकल यूनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. रामअवतार गुप्ता एका खासगी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सीट वाढविण्यासाठी लाच मागत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचण्यात आला आणि रामअवतार गुप्ता यांना पाच लाखांची लाच घेताना सरकारी गेस्ट हाऊसमधून रंगेहात अटक करण्यात आली आहे.
लाचेच्या रकमेसोबतच सरकारी गेस्ट हाऊसच्या झडतीत जवळपास २१ लाख रुपये रोकड सापडले आहेत. गेस्ट हाऊसमध्ये डॉ. रामअवतार गुप्ता गेल्या चार दिवसांपासून राहत होते. एसीबीचे अतिरिक्त महानिर्देशक दिनेश एम.एन.के. यांच्या अंतर्गत आरोपीच्या निवासस्थानी आणि इतर ठिकाणी आता छापेमारी करण्यात येत आहे.
एसीबीकडून भ्रष्टाचार निवारण अधिनियम अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल. एसीबीच्या टीमनं रामअवतार गुप्ता यांच्या निवासस्थानी केलेल्या तपासात ३ लाख ६४ हजार रुपये रोकड, ४५८ ग्रॅम सोनं, ६.६९ किलो चांदी देखील जप्त करण्यात आली आहे. यासोबतच रामअवतार आणि त्यांच्या पत्नीच्या नावावर एकूण १८ बँकांमधील विविध खात्यांमध्ये मिळून ६८ लाख ७२ हजार रुपये रोकड मिळाली आहे.
रामअवतार यांचा मुलगा, मुलगी आणि सुनेच्या ७ बँक खात्यांमध्ये १० लाख ८४ हजार रुपये सापडले आहेत. तसंच एचडीएफसी बँकेत एक लॉकर रामअवतार यांच्या नावावर आहे. जयपूरमध्ये आरोपीच्या नावावर एक फ्लॅट आणि एक जमीन असल्याची कागदपत्रं देखील सापडली आहेत. इतकंच नव्हे तर त्यांची पत्नी आणि बहिणीच्या नावावर एकूण ११ प्लॉट असल्याची कागदपत्र देखील सापडली आहेत.