राजस्थानमध्ये विचित्र आणि तेवढीच भयावह दुर्घटना घडली आहे. शनिवारी रात्री एक आराम बस विद्युतभारीत तारेच्या संपर्कात आल्याने बसमध्ये विद्युत प्रवाह पसरला. यामध्ये सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर जवळपास २० हून अधिक प्रवासी होरपळले आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली. बसमधील जखमी प्रवाशांना बाहेर काढून जिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिल्हा हॉस्पिटलचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस पी शर्मा यांनी ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. हा अपघात जालौर जिल्ह्याच्या महेशपुरा गावामध्ये झाला. या अपघातात ६ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना जोधपूरला पाठविण्यात आले आहे. तसेच १३ जणांवर जिल्हा हॉस्पिटलमध्येच उपचार सुरु आहेत. बस रस्ता चुकल्याने गावामध्ये आली होती. महेशपुराचे रहिवासी घनश्याम सिंह यांनी सांगितले की, ही बस मांडोलीहून ब्यावरसाठी निगाली होती. मात्र, रात्री रस्ता चुकली. यामुळे ही बस महेशपुरा गावात आली होती. गावातील ११ केव्हीच्या विद्युतभारीत तारेला बसच्या टपाचा स्पर्श झाला. यामुळे बसला आग लागली. तसेच वीजही प्रवाही झाली.
स्थानिकांनी वीज वितरण विभागाला माहिती देत वीज बंद करायला लावली. यानंतर लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिसांनाही बोलावले.