डाबडी: उत्तराखंडमध्ये हत्येचं एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एका व्यक्तीनं आधी महिलेवर बलात्कार केला. मग तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर कोरोना लस देण्याच्या बहाण्यानं तिला डोंगरावर नेऊन धक्का दिला. महिलेच्या हत्या प्रकरणात डाबडी पोलीस आरोपीची चौकशी करत आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारका न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली. त्यानंतर हळूहळू धक्कादायक माहिती उघडकीस येऊ लागली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डाबडीमध्ये वास्तव्यास असलेल्या महिलेवर एका व्यक्तीनं जुलै २०२० मध्ये लग्न करण्याचं आश्वासन देऊन बलात्कार केला. पोलिसांनी ऑगस्ट २०२० मध्ये गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला तुरुंगवास घडला. काही महिन्यानंतर महिलेनं न्यायालयाला आणि पोलिसांना शपथपत्र दिलं. आरोपी तरुणाशी लग्न करत असल्यानं त्याच्याविरोधातील फिर्याद तिनं मागे घेतली. त्यानंतर आरोपीची तुरुंगातून सुटका झाली. ऑक्टोबर २०२० मध्ये दोघांनी विवाह केला.
लग्नानंतर दोघांमध्ये वारंवार वाद व्हायचे. लहानसहान गोष्टींवरून होणारे वाद टोकाला जायचे. बऱ्याचदा दोघे एकमेकांवर हात उगारायचे. आरोपी उत्तराखंडच्या उधम सिंह नगरचा रहिवासी आहे. सासूमुळे पत्नी वारंवार माहेरी जाते. तिच्यामुळेच घरात भांडणं होत असल्याचं आरोपीला वाटायचं, अशी माहिती पोलिसांनी दिली.
७ जून २०२१ रोजी पती पत्नीचं भांडण झालं. त्यानंतर ती माहेरी निघून गेली. तरुणानं ११ जूनला पत्नीला फोन केला आणि तिला उत्तराखंडमधील त्याच्या घरी येण्यास सांगितलं. तरुणीचे कुटुंबीय तिला जाऊ देत नव्हते. मात्र तरुणानं त्यांच्याशी संवाद साधून माफी मागितली. तुमच्या मुलीला त्रास देणार नाही, असं आश्वासन त्यानं दिलं. सासरच्या व्यक्तींची समजूत काढल्यावर पती पत्नीला कोरोना लसीकरणासाठी घेऊन गेला.
मुलगी सासरी गेल्यावर तिच्या आईनं अनेकदा तिला फोन केला. मात्र तिचा फोन बंद होता. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी द्वारका न्यायायलात धाव घेतली. त्यांनी आरोपी राजेश विरोधात अपहरणाची तक्रार दिली. न्यायालयानं चौकशीचे आदेश देताच पोलिसांनी तपास सुरू केला. महिला आणि आरोपीचं शेवटचं लोकेशन नैनीतालमध्ये एकत्र आढळून आलं. चौकशी दरम्यान पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं हत्येची कबुली दिली. दररोजच्या भांडणांचा वैताग आल्यानं पत्नीला डोंगरावरून खाली फेकून दिल्याचं राजेशनं पोलिसांना सांगितलं.