नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने सोमवारी वैद्यकीय मंडळाचा अहवाल विचारात घेता बलात्कार पीडित तरुणीला गर्भपात करण्याची परवानगी दिली, तसेच गर्भाच्या डीएनए चाचणीकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
न्यायमूर्ती विनय देशपांडे व अमित बोरकर यांच्या न्यायपीठाने पीडित तरुणीला हा दिलासा दिला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे तरुणीचा गर्भपात केला जाणार आहे. न्यायालयाने गेल्या २४ ऑगस्ट रोजी तरुणीच्या तपासणीसाठी वैद्यकीय मंडळ स्थापन करण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार, सर्व सबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचे मंडळ स्थापन करून तरुणीची तपासणी करण्यात आली. मंडळाने तरुणीचा गर्भपात करणे शक्य असल्याचा अहवाल न्यायालयात सादर केला. पीडित तरुणी १७ वर्षे वयाची असून तिच्या गर्भात २० आठवड्याचे बाळ आहे. तिने गर्भपाताची परवानगी मिळविण्यासाठी याचिका दाखल केली होती. तरुणीच्या वतीने ॲड. आदिल मिर्झा तर, सरकारतर्फे ॲड. संजय डोईफोडे यांनी कामकाज पाहिले.
अनिलकुमार श्रीवास्तववर बलात्काराचा आरोप
२०१५ मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर तरुणीच्या आईने मुख्य आरोपी अनिलकुमार श्रीवास्तव याच्यासोबत संबंध जोडले. दरम्यान, श्रीवास्तवने तरुणीचे वारंवार लैंगिक शोषण केले. त्यामुळे तिला गर्भधारणा झाली. सततचा शारीरिक-मानसिक त्रास असह्य झाल्यानंतर मुलीने २५ जून २०२१ रोजी खापरखेडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून श्रीवास्तवसह तीन आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.