पोलिसांविरुद्ध गुन्हा दाखल करा; विजयच्या कुटुंबीयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 03:24 PM2019-11-04T15:24:33+5:302019-11-04T15:26:21+5:30
अनेक गैरसमज व अफवा पसरत असल्याने घटनेची सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन
मुंबई - पोलिसांच्या मारहाणीमुळेच विजयचा मृत्यू झाल्याचा आरोप करत, त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी विजयच्या कुटुंबीयांनी केली आहे. मुंबईतील अंधेरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत विजयचा भाऊ निर्मल सिंग वडील हृदयनारायण सिंग आणि वकील विनय नायर यांनी याच आरोपाचा पुनरुच्चार केला. विजय सिंहच्या मृत्यूबद्दल समाजामध्ये व माध्यमांमध्ये अनेक गैरसमज व अफवा पसरत असल्याने घटनेची सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केल्याचे वकिलांनी संगितले.
पुढे माहिती देताना त्यांनी सांगितले की, पोलीस ठाण्यात जोडप्याने विजयवर छेड काढत असल्याचा आरोप केला. यानंतर, विजयच्या छातीत दुखू लागले व त्याचा श्वास कोंडला. त्यामुळे म्हणून विजयने पोलिसांना पंखा लावण्याची विनंती केली. पोलिसांनी त्याला नकार देत तक्रार करत असलेल्या जोडप्यासोबत हसू लागले.
पोलिसांविरुद्ध निदर्शने
विजयचे वडील म्हणाले की, विजय खाली कोसळल्यानंतर मी पोलिसांना विजयला रुग्णालयात दाखल करण्याची विनंती केली, परंतु पोलिसांनी गाडीत डिझेल नसल्याचे कारण दिले. त्यामुळे विजयला मी टॅक्सीतून सायन रुग्णालयात घेऊन गेलो, परंतु तिथे त्याला मृत घोषित केले.
च्पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच विजयचा मृत्यू झाला. त्यामुळे या पोलिसांवर केवळ निलंबनाची कारवाई न करता त्यांच्यावर हत्येचा गुन्हा नोंदविण्यात यावा, अशी मागणी कुटुंबीयांतर्फे करण्यात आली होती. पत्रकार परिषद संपल्यावर अंधेरीतील सुभाषनगर परिसरात नागरिकांकडून वडाळा टी. टी. पोलिसांविरुद्ध निदर्शने करण्यात आली, तसेच घोषणा देत मार्च काढण्यात आला.