बहुचर्चित ५ जणांच्या हत्याकांडातून पोलीस उलगडणार नात्यांचा गुंता; अनैतिक संबंध अन् बरंच काही...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:11 AM2021-06-24T00:11:12+5:302021-06-24T00:14:29+5:30
बहुचर्चित पाच जणांचे हत्याकांड : नाजूक पैलूंसह नात्यातील गुंतागुंतही तपासणार, मृतकाच्या डीएनए सॅम्पलचे विश्लेषण
नरेश डोंगरे
नागपूर : अनैतिक संबंधामुळे निर्माण झालेल्या विकृतीतून घडलेल्या पाचपावलीच्या हत्याकांडातील अनेक नाजूक मुद्दे अजून गुलदस्त्यातच आहेत. त्याचा उलगडा करण्यासाठी आरोपीसह सहाही मृतकांचे डीएनए सॅम्पल घेऊन पोलिसांनी ते विश्लेषणासाठी फॉरेन्सिक तज्ञांकडे पाठवले आहेत. यातून पोलिस आरोपी तसेच मृतांच्या नात्यातील गुंतागुंत तपासणार आहेत. पाचपावलीतील बागल आखाड्याजवळच्या भागात भिशीकर यांच्या घरी राहणारा क्रूरकर्मा आलोक उर्फ चंदू अशोक मातुरकर याने त्याची मेव्हणी अमिषा, सासू लक्ष्मीबाई बोबडे, पत्नी विजया, मुलगी परी आणि साहिल नामक मुलाची अत्यंत निर्घुणपणे हत्या केली.
रविवारी मध्यरात्रीनंतर घडलेल्या या थरारक हत्याकांडाने समाजमन सुन्न झाले आहे. हत्याकांड उघडकीस आल्यानंतर ते घडवून आणणारा आरोपीही परिस्थितीजन्य पुराव्यावरून उजेडात आल्यामुळे आणि त्याने स्वतःला संपवून घेतल्यामुळे पोलिसांना या हत्याकांडात आता फक्त तपासाची कागदोपत्री प्रक्रियाच पूर्ण करावी लागणार आहे. मात्र, या प्रकरणाने माणसातील पाशवी वृत्तीला अधोरेखित केल्यामुळे पोलिसांसाठी हे प्रकरण 'रिसर्च बेस स्टोरी'' ठरले आहे. आरोपी आलोकचे त्याची मेव्हणी अमिषासोबत अनैतिक संबंध होते. हे दोघे नेहमीच शरीर संबंध प्रस्थापित करायचे, हे उघड झाले आहे. अमिषा स्वैराचारी बनल्यामुळे आलोक सैतान बनल्याचेही उघड झाले आहे. परिस्थितीजन्य पुराव्यावरून पोलिसांनी हा निष्कर्ष काढला असला तरी यामागे आणखी काही वेगळी 'स्टोरी' असावी असेही काही पोलिस अधिकाऱ्यांचे मत आहे. त्याचमुळे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सायंटिफिक पद्धतीने करण्यास सुरुवात केली आहे.
या पार्श्वभूमीवर, पोलिसांनी आरोपी आलोक तसेच अन्य पाच मृतकांचे डीएनए सॅम्पल घेतले आहे. ते तज्ञांकडे विश्लेषणासाठी पाठविण्यात आले आहे. आलोकच्या डोक्यात पत्नी आणि मुलांबाबत दुसरा काही संशय होता का, मृत विजया आणि अमिषा या दोघी किंवा दोघींपैकी कुणी गर्भवती होते का, हे आणि आणखीही असेच काही नाजूक पैलू पोलीस डीएनए टेस्टच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करीत आहेत. बलात्काराचा उल्लेख नाही या हत्याकांडाला आता तीन दिवस झाले. मात्र, डॉक्टरांकडुन पोलिसांना अजून फायनल पीएम रिपोर्ट मिळालेला नाही. डॉक्टरांनी प्रायमरी रिपोर्ट दिला, त्यात चौघांचा मृत्यू गळा कापल्यामुळे, तर साहिलचा मृत्यू तोंडावर उशी दाबल्याने श्वास गुदमरल्यामुळे झाल्याचे स्पष्ट केले आहे. अमिषाचा मृतदेह पोलिसांना नग्नावस्थेत आढळला. तिचे आणि आरोपीचे अंतर्वस्त्रे बाजूला पडून होते. त्यावरून त्याने अमिषाशी शरीरसंबंध प्रस्थापित केल्याचा अंदाज पोलीस अधिकाऱ्यांनी काढला आहे. मात्र प्रायमरी रिपोर्टमध्ये बलात्कार किंवा शरीरसंबंध याबाबतचा खुलासा झालेला नाही. फायनल रिपोर्ट मध्ये त्याबाबत वैद्यकीय तज्ञ आपले मत नोंदवणार असल्याचे समजते.