प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच ग्रामस्थाची ग्राम सचिवाला मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 12:14 PM2020-01-26T12:14:07+5:302020-01-26T13:49:37+5:30
आरोपीवर गुन्हा दाखल, कारण वेगळेच असल्याची गावात चर्चा
चेतन घोगरे
अंजनगाव सुर्जी :चिंचोली खुर्द ग्रामपंचायत मध्ये प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी ग्रामसभा सुरू होण्याच्या अगोदरच ग्रामसचिव व गावातील नागरिक गुणवंत मानकर यांच्यामध्ये हाणामारी झाली. त्यानंतर ग्राम सचिवाच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे.
चिंचोली खुर्द ग्रामपंचायत आवारात प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळी झेंडावंदन झाल्यानंतर ग्रामसचिव रमेश सुखदेवराव उईके (वय ५०) व ग्रामपंचायत कर्मचारी नंदकिशोर वसु, कमलेश खंडारे, प्रमोद आंबडकर हे आपल्या कार्यालयात शासकीय कामकाज करत होते. त्यावेळी गावातील नागरिक गुणवंत तुळशीराम मानकर हे आले. त्यांनी माझ्या घरकुलाचे व संडासचे काम का झाले नाही यावरुन वाद घातला. त्यानंतर शिवीगाळ केली व त्यांनी मारहाण केली व शासकीय दस्तावेजाची0 नासधूस केल्याची तक्रार रमापुर पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे.
यावेळी तेथील फोटोंचे नुकसान झाले. यामुळे काही वेळ गावामध्ये तणावाचे वातावरण होते. ग्रामसचिव यांच्या तक्रारीवरून रहिमापूर पोलीस ठाण्यात मुंबई अधिनियम ३५३, ३३२, ४२७, ५०४ गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिवांच्या तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला. तसेच तात्काळ अटक करण्यात आली आहे.
- जमील शेख ,ठाणेदार रहिमापुर
सत्य घटना वेगळीच....
आरोपी हा मागील पाच महिन्यांपासून आपल्या राहत्या घराची माहिती ग्रामसचिवाकडे मागत होता. पण गावातील राजकारणामुळे ग्रामसचिव माहिती देण्यास टाळाटाळ करीत होता. म्हणून आज हे पाऊल गुणवंत मानकर यांनी उचल्याची चर्चा गावात रंगली होती.