अवैध रेती माफियांवर महसूल विभागाची धडक कारवाई;४० लाखांचा मुद्देमाल जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 05:19 PM2021-01-22T17:19:02+5:302021-01-22T17:21:34+5:30
Crime News : खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले.
नितिन पंडीत
भिवंडी - राज्य शासनाने अवैध रेती उपसा करण्यास बंदी घातली असतांनाही रेती माफिये रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन लोखंडी बार्जद्वारे खाडीपात्रातून अवैध रेती उपसा करत असल्याचा खबर ठाणेजिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना मिळाली असता त्याच्या आदेशाने भिवंडी प्रांताधिकारी डॉ मोहन नळदकर तसेच तहसीलदार अधिक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार गोरख फडतरे तसेच माहुल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच पोलीस प्रशासनाने गुरुवार रात्र ते शुक्रवारी पहाटेपर्यंत जागता पहारा देत काल्हेर कशेळी तसेच कोनगाव खाडीत छापा टाकला असता खाडी पात्रामध्ये अवैध्यरित्या रेती उपसा व अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर धडक कारवाई केली असून या कारवाईत सुमारे ३० लाख रुपये किंमतीचे ३ सक्शन पंप व ३ बार्ज जप्त करण्यात आले.
खाजगी बोटीच्या साहाय्याने महसूल व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी हे सक्शन पंप व बार्ज पकडले असून सदर बार्ज व सक्शन पंप खाडी किनारी आणून हायड्राद्वारे किनाऱ्यावर काढून गॅस कटरच्या साह्याने त्याचे तुकडे करून ते नष्ट करण्यात आले. तसेच खाडी किनाऱ्यावरून अवैध रेती वाहतूक करणारी एकूण ५ वाहने पकडण्यात आली असून त्यामध्ये सुमारे १० लाख रुपये किंमतीची सुमारे १० ब्रास एवढी अवैद्य रेती या कारवाईत जप्त करण्यात आली आहे . सदरची वाहने जप्त करून दंडनीय कारवाईसाठी तहसील कार्यालय येथे जमा करण्यात आली असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या या धडक कारवाईने कल्याण व भिवंडीतील रेती माफिया व अवैध रेती वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.