औरंगाबाद: भावजयीच्या खूनाच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना बारा वर्षापूर्वी पॅरोल रजा घेतल्यानंतर फरार झालेल्या आरोपीला गुन्हेशाखेने मालेगावात बेड्या ठोकल्या. आरोपी हा मालेगावात रिक्षा चालवून गूपचूप राहात होता. अशाप्रकारे औरंगाबाद शहरातील आणखी अकरा कैदी कारागृहातून पॅरोल रजा घेतल्यांनतर पसार झाले असून त्यांचा शोध गुन्हेशाखेकडून सुरू आहे.
मोहम्मद अल्तमश मोहम्मद ईस्माईल (४८,रा. आरेफ कॉलनी)असे अटकेतील कैद्याचे नाव आहे. याविषयी अधिक माहिती अशी की, १९९९ साली भावजयीचा जाळून खून करण्यात आला होता. या खटल्यात मृताच्या पतीची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती आणि आरोपी अल्तमश आणि त्याच्या आईला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान अल्तमशहा हर्सूल कारागृहात शिक्षा भोगत असताना जुलै २००७ मध्ये तो १ महिन्याची पॅरोल रजा घेऊन कारागृहातून बाहेर पडला. यानंतर त्याने काही दिवस रजेचा कालावधी वाढविला.रजेचा कालावधी समाप्त झाल्यानंतर कारागृहात परत न जाता तो फरार झाला. तेव्हापासून कारागृह प्रशासन त्याची परत येण्याची प्रतिक्षा करीत होते. तो परत येत नसल्याने २०१३ साली आरोपी अल्तमशविरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. पोलिसांनी तेव्हाही त्याचा शोध घेतला,मात्र तो पोलिसांना सापडत नव्हता.
दरम्यान, कारागृह प्रशासनाने नुकतीच १२ पसार कैद्यांची यादी पोलीस आयुक्तांना पाठविली. ही यादी गुन्हेशाखेकडे आली होती. आयुक्तांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मधूकर सावंत, सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, पोलीस कर्मचारी शिवाजी झिने, शेख बाबर,राजेंद्र साळुंके, संजय जाधव, प्रकाश चव्हाण, प्रभाकर राऊत, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर यांच्या पथकाने अल्तमशचा शोध सुरू केला. तेव्हा त्याची पत्नी मुलाबाळासह खुलताबाद तालुक्यात राहत असल्याचे समजले. मात्र तेथे न राहता अल्तमश हा अधूनमधून चोरून पत्नीला भेटायला येतो आणि परत जातो, असे समजले. अल्तमश मालेगाव (जि.नाशिक)येथे रिक्षा चालवित असल्याची माहिती खबऱ्याने पथकाला दिली. नंतर पथक मालेगाव येथे गेले. तेथे दोन दिवस शोध घेतल्यानंतर अल्तमशच्या मुसक्या आवळल्या. तेव्हा सुरवातीला तो मी नव्हेच अशी भूमिका त्याने घेतली.मात्र पोलिसांनी त्याचा जूने छायाचित्र दाखविताच त्याने शरणागती पत्कारली.