चहावाल्याने दिली होती लुटारूंना टीप
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2019 02:48 PM2019-06-07T14:48:13+5:302019-06-07T14:49:27+5:30
पेट्रोल पंपाची रोकड लुटून नेणाऱ्या टोळीला अटक
कल्याण - पेट्रोल पंपाची रोकड लुटून नेणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असून चहावाल्याने दिलेल्या टिपच्या आधारावर आरोपींनी हा गुन्हा केल्याची माहिती उघड झाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असल्याची माहिती अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या महिन्यात ३१ तारखेला सकाळी १० वाजण्याच्या सुमारास मुरबाड रोडवरील विजय बाग परिसरात हा गुन्हा घडला होता. पेट्रोल पंपावर जमा होणारी १२ लाख ४० हजारांची रोकड आणि सव्वातीन लाखांचे ४ चेक घेऊन प्रदीप सिंह हे बँकेत भरण्यासाठी चालले होते. त्यावेळी दबा धरून बसलेल्या आरोपींनी पाठीमागून येऊन त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या हातातील बॅग खेचून पोबारा केला होता.
याप्रकरणी पोलिसांनी कोणतीही माहिती नसताना तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींना बेड्या ठोकल्या.
यातील मुख्य आरोपी सचिन विनोद शिरोडकर, सोमनाथ उर्फ गणेश खंडागळे, नितीन पवार, रुपेश रमेश म्हात्रे, सोनू दिलीप सुरवसे आणि वैभव विलास भास्कर या 6 जणांना अटक केली. विशेष म्हणजे मुख्य आरोपीसह इतर काही आरोपींवर विविध पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही कराळे यांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश लोंढे, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण दायमा, सुरेश डांबरे, अविनाश पाळदे (अँटी रॉबरी स्कॉड), पोलीस हवालदार शिंदे, पोलीस नाईक निकाळे, भालेराव, सुनिल पवार, दळवी, चौधरी, भणगे, पोलीस शिपाई गोसावी, पवार, अँटी रॉबरी स्कॉडचे पोलीस नाईक सुनिल पवार, अमोल गोरे, नरेंद्र बागुल, रुपेश सावळे, दिपक गडगे, चिंतामण कातकडे, पोलीस शिपाई रविंद्र हासे, गावित, पिंजारी, महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे सपोउनि पवार, पोलीस नाईक शिर्के, माने, ठिकेकर आदींच्या पथकाने केली.