दरोडेखोरांना केवळ पाच दिवसांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 01:32 AM2021-04-03T01:32:53+5:302021-04-03T01:33:07+5:30
रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती.
टिटवाळा : रायते गावाजवळील कडबा कुटीच्या दुकानात शिरलेल्या चार अनोळखी व्यक्तींनी दुकानमालकास बॅटने व तलवारीसारख्या हत्याराने ठार मारण्याचा प्रयत्न करत त्याच्याकडून पाच हजारांचा मोबाइल व दुकानातील ४० हजारांची रोकड लंपास केल्याची घटना २० मार्चला घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली आहे, तसेच उर्वरित तिघा आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.
वाहोली येथील रहिवासी मोतीसम शेंदू (४५) यांचे कल्याण- मुरबाड महामार्गावर रायते गावाजवळ दुकान आहे. २० मार्चला पहाटे ४.३५ वाजेच्या सुमारास दुकानात चार चोरट्यांनी घुसून शेंदू यांना मारहाण केली. त्यानंतर मोबाइल व ४० हजार लंपास केले. तपासादरम्यान या गुन्ह्यातील चार व इतर पाच, अशा नऊ चोरट्यांनी पावशेपाडा व पांजारपोळ येथे दरोडा घालून जवळजवळ चार लाखांचा मुद्देमाल लंपास केला असल्याची बाब टिटवाळा पोलिसांच्या निदर्शनास आली. या घटनांतील दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी उपविभागीय अधिकारी, मुरबाड डॉ. बसराज शिवपुजे, टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे यांनी एक विशेष पथक स्थापन केले. तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्ह्यातील तीन आरोपींना अवघ्या पाच दिवसांत २५ मार्चला पारनेर येथून अटक केली.
कोठडीत केली रवानगी
पोलीस कोठडीत असलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनुसार इतर तीन आरोपींना २८ मार्चला पारनेर येथून अटक करण्यात आली. त्यांना १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे, तर १ एप्रिलला हजर केलेल्या तीन आरोपींना ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.