वृद्धेला घरात बांधून सात लाखाचा दरोडा; वॉचमनसह तिघांवर गुन्हा, उल्हासनगरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 07:21 AM2021-11-07T07:21:14+5:302021-11-07T07:21:20+5:30
घरातील कपाटातून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरी करून पोबारा केला.
उल्हासनगर : कॅम्प नं-३ मधील लाल व्हीला इमारतीच्या नेपाळी वॉचमनने तीन साथीदारांच्या मदतीने फ्लॅटमध्ये एकट्या असलेल्या ७६ वर्षीय लाजवंती बजाज यांना बांधून घरातून ४ लाख ६० हजार रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ३७ हजाराचा ऐवज लंपास केला. हा प्रकार शुक्रवारी घडला असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वॉचमनसह चार जणांवर गुन्हा दाखल झाला.
गोल चक्रा गार्डनजवळील लाल व्हीला इमारतीमध्ये लाजवंती या मुलगा मनोजकुमार, सून व नातवंडांसह राहतात. शुक्रवारी लाजवंती घरी एकट्या असताना इमारतीचा नेपाळी वॉचमन दीपक खडाका याने पाण्याचा नळ चालू आहे, असा बहाणा करून घरात घुसला. त्यापाठोपाठ त्याचे तीन साथीदार घरात घुसले व त्यांनी वृद्ध लाजवंती यांना ठार मारण्याची धमकी देऊन दोरीने बांधून ठेवले.
घरातील कपाटातून रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ७ लाख ३७ हजाराचा ऐवज चोरी करून पोबारा केला. सायंकाळी बजाज कुटुंबातील इतर सदस्य घरी परतले असता, घराचे दार आतून बंद होते. घर उघडल्यावर लाजवंती यांना बांधून ठेवून वॉचमनने चोरी केल्याचे उघड झाले.
मध्यवर्ती पोलीस ठाण्यात वॉचमन दीपक खडाका याच्यासह त्याच्या तीन साथीदारावर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत. यापूर्वीही नेपाळी वॉचमननी भरवस्तीमधील मुथुट फायनान्सच्या कार्यालयावरील दरोड्याचा केलेला प्रयत्न विठ्ठलवाडी पोलिसांनी हाणून पाडला होता. त्यापूर्वी भाटिया चौकातील उद्योगपती उधावंत यांच्या घरी त्यांच्याच इमारतीच्या वॉचमनने लाखोंची चोरी केली होती.